सध्या संपूर्ण देशभरात करोना विषाणूचं सावट पसरलेलं आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलेलं आहे. या खडतर काळातही मुंबई पोलीस रस्त्यावर उतरुन आपलं कर्तव्य बजावत आहेत. मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांना करोनाशी लढताना आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व त्याची पत्नी अनुष्का शर्माने मुंबई पोलीस दलाच्या वेलफेअर फंडासाठी प्रत्येकी ५ लाखांची मदत केली आहे.

मुंबई पोलीस आयुक्ती परमबीर सिंह यांच्या कार्यालयाने विराट-अनुष्काचे या योगदानाबद्दल आभार मानले आहेत.

परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्नांची पराकाष्टा करत आहे. करोनामुळे गाळात रुतलेलं अर्थचक्र बाहेर काढण्यासाठी सरकारने करोनाचा प्रभाव कमी असलेल्या भागात दुकानं उघडण्यास परवानगी दिली आहे. सध्याच्या संकटकाळात मुंबई पोलिसांसह सर्व यंत्रणा आश्वासक काम करत आहे. त्यामुळे विराट-अनुष्काने केलेल्या मदतीबद्दल सोशल मीडिवार त्यांचं कौतुक केलं जात आहे.