विश्व हिंदू परिषदेचा शिवसेनेला टोला

शिवसेनेच्या अयोध्या मोहिमेवर विश्व हिंदू परिषदेनेही हल्ला चढविला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आधी मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारावे आणि मग अयोध्येकडे लक्ष द्यावे, असे टीकास्त्र परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माजी न्या. विष्णू कोकजे यांनी सोडले आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या रुग्णसेवा सदनाच्या रविवारी झालेल्या वर्धापनदिन समारंभाला कोकजे उपस्थित होते. ठाकरे अयोध्येत २५ नोव्हेंबरला शक्तीप्रदर्शन करणार आहेत. पण महाराष्ट्रात परप्रांतीयांच्या मुद्दय़ावरून ते उत्तरभारतीयांना झोडतात. त्यामुळे उत्तरप्रदेशात जाऊन ते कोणते आवाहन करणार आहेत, असा सवाल कोकजे यांनी केला आहे. शिवसेनेला इतक्या वर्षांनी राम मंदिराचा मुद्दा कसा आठवला? त्यांची तेथे ताकद किती, असा प्रश्नही कोकजे यांनी उपस्थित केला.

शबरीमला मंदिरामध्ये महिलांच्या प्रवेशाच्या मुद्दय़ावरून सुरू असलेल्या वादाबाबतही त्यांनी मत व्यक्त केले. ज्या महिला पत्रकार व कार्यकर्त्यां तेथे जात आहेत, त्यांना इतके दिवस हे मंदिर कुठे होते, ते माहीतही नव्हते, अशी टिप्पणी कोकजे यांनी केली.

अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने कायदा करावा. न्यायालयाच्या निकालाची किती काळ प्रतीक्षा करणार? त्याऐवजी अध्यादेश जारी करावा.    – विष्णू कोकजे, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, विहिंप.