वांद्रे परिसरातील सुमारे ४० वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेले स्टॉल्स अनधिकृत ठरवून तोडून टाकणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना फोनवरून जाब विचारत त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकी देणारे महापौर विश्वनाथ महाडेश्वर अडचणीत आले आहेत. महापौरांनी संबंधित अधिकाऱ्याशी मोबाइलवरील केलेले संभाषण वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्यानंतर शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली.

पालिकेने काही बेरोजगारांना वांद्रे (प.) येथे स्टॉल्स सुरू करण्यासाठी परवाने दिले होते. स्टॉलधारकांकडून पालिकेच्या अटी आणि शर्तीचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पालिकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना दिलेले परवाने रद्द केले आणि गुरुवारी हे स्टॉल तोडून टाकले. आपले परवाने रद्द करुन स्टॉल तोडल्याची तक्रार घेऊन हे स्टॉलधारक विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडे आले होते. त्यांचे गाऱ्हाणे ऐकून झाल्यानंतर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पालिकेच्या एच-पश्चिम विभाग कार्यालयातील अनुज्ञापन विभागातील कर्मचाऱ्याशी मोबाइलवर संपर्क साधला.

या स्टॉलधारकांनी अटी-शर्तीचा भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. आपण माझ्या वरिष्ठांशी संपर्क साधावे, असे या कर्मचाऱ्याने महापौरांना सांगितले. अटी-शर्तीचे तुम्हीही पालन करीत नाही, त्यामुळे तुमच्यावरही कारवाई करायला हवी, असे विश्वनाथ महाडेश्वर यांनी या कर्मचाऱ्याला दरडावून सांगितले.

महापौर आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोबाइलवर झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिग वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाले आणि महापौर अडचणीत आले. यापूर्वी मनसेचे तत्कालीन गटनेते संदीप देशपांडे यांनी माजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्यासमवेत मोबाइलवर महापौर निधीबाबत झालले संभाषण वृत्तवाहिन्यांना उपलब्ध केल्यामुळे त्या अडचणीत आल्या होत्या.  आता महापौर महाडेश्वर अडचणीत आले आहेत.

आयुक्तांकडे तक्रार करणार

पालिकेचे कर्मचारी मोबाइलवर झालेल्या संभाषणाचे रेकॉर्डिग अशा पद्धतीने वृत्तवाहिन्यांना उपलब्ध करीत असतील तर ते योग्य नाही. अधिकारी, कर्मचारी उद्या आयुक्तांशी मोबाइलवर झालेले संभाषण वृत्तवाहिन्यांपर्यंत पोहोचवतील आणि आपला बचाव करण्याचा प्रयत्न करतील. हे प्रकरण गंभीर असून याबाबत आपण पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे तक्रार करणार आहोत, असे विश्वनाथ महाडेश्वर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.