अन्य पर्यायाची मागणी करणार

दादरच्या आलिशान महापौरनिवासाला पर्याय म्हणून प्रशासनाकडून पुढे करण्यात आलेल्या भायखळा उद्यानातील बंगल्यावर काट मारण्याचा निर्णय महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घेतला आहे. या ठिकाणी शांतताक्षेत्र असल्याने तसेच संध्याकाळी सहानंतर कोणत्याही प्रकारे आवाज करण्यास प्रतिबंध असल्याने महापौर निवासस्थानी होणाऱ्या अनेक कार्यक्रमांवर मर्यादा येणार असल्याचा मुद्दा पुढे करण्यात आला असून महापौरपदाच्या सन्मानाला साजेसे निवासस्थान लवकरात लवकर शोधण्यासाठी प्रशासनाला कळवण्यात येणार आहे.

सरकारने वरळी येथील महापौरनिवासात स्मारक उभारण्यास हिरवा कंदील दाखवल्यानंतर नवनिर्वाचित महापौरांच्या तेथील प्रवेशाबाबतच शंका उपस्थित करण्यात येत होत्या. मात्र महाडेश्वर यांनी महापौर म्हणून या बंगल्यात प्रवेश केला. आता महापौरांना नव्या निवासस्थानी जावे लागणार आहे. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील बंगला महापौर निवासस्थानाला पर्याय म्हणून प्रशासनाने पुढे केला असला तरी खुद्द महापौर या जागेविषयी नाखूश आहेत. या ठिकाणी उद्यान व प्राणिसंग्रहालय असल्याने शांतता क्षेत्र आहे. महापौरांना भेटायला अनेक परदेशी पाहुणे येतात, महापौर निवासस्थानी अनेक कार्यक्रमांचे आयोजन होते. शांतता क्षेत्र असल्याने हे कार्यक्रम करण्यात अडचणी येतील, त्यामुळे दुसरी जागा शोधण्याचा आग्रह महापौरांच्या निकटवर्तीयांकडून केला जात आहे. महापौरनिवासस्थानासाठी भायखळा उद्यानातील बंगल्याचा पर्याय सुचवणारे प्रशासनाचे पत्र मिळाले आहे. मात्र मला हा पर्याय मान्य नाही. हे शांतता क्षेत्र असल्याने तसेच या परिसरात वन्यजीव असल्याने येथे शांतता पाळणे आवश्यक आहे, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सांगितले. मात्र उद्यानातील बंगल्याला इतर पर्याय महापौरांकडून सुचवला जाणार नाही. हा व्यक्तीच्या निवासस्थानाचा प्रश्न नाही. पुढील काळात होणाऱ्या महापौरांसाठीही हे निवासस्थान योग्य असावे, यादृष्टीने माझा प्रयत्न आहे. मुंबईच्या महापौरपदाला शोभेल, त्याचा सन्मान होईल, असा पर्याय प्रशासनाने लवकरात लवकर शोधणे गरजेचे आहे, तसे त्यांना कळवले जाईल, असेही महाडेश्वर यांनी स्पष्ट केले.

महापौरांच्या सध्याच्या निवासस्थानाच्या तुलनेत उद्यानातील बंगल्याची जागा कमी असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले होते. शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी महापौरांच्या स्थानासाठी आयुक्तांचा एम. एल. डहाणुकर मार्ग येथील बंगला योग्य असल्याचे सांगितले होते. याबाबत प्रशासनाने कोणताही प्रतिसाद दिला नव्हता. महापौरांना पर्याय म्हणून दिलेल्या भायखळा उद्यानातील बंगल्यात यापूर्वी साहाय्यक आयुक्त तसेच उद्यान अधिकारी राहत होते. सध्या या बंगल्यात कोणीही राहत नाही.