मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आज, सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दोघांमध्ये भेट झाली. या भेटीदरम्यान त्यांच्यात काही काळ चर्चा झाली. मात्र, या भेटीचं कारण आणि तपशील अद्याप गुलदस्त्यातच आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. दोघांमध्ये तब्बल पाऊण तास चर्चा झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विश्वास नांगरे-पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. सलग दुसऱ्या दिवशीच्या या ‘भेटसत्रा’मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण या दोन्ही बैठकांमागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
नांगरे पाटील यांची मुंबईत बदली –
उद्धव ठाकरे सरकारने सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच ४० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये नाशिक पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळणारे विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी बदली केली होती. विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबईत पदभार स्वीकारला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 28, 2020 5:17 pm