संदीप आचार्य / निशांत सरवणकर

  • वादग्रस्त ३३ प्रकरणांची चौकशी अपूर्ण

निवृत्तीला काही दिवस शिल्लक असताना कमालीची गतिमानता दाखवत असंख्य फाईली निकालात काढणारे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्या काळातील वादग्रस्त ३३ प्रकरणांची चौकशी अद्याप प्राधिकरणाने पूर्ण केलेली नाही. याप्रकरणी आता वर्ष होत आले तरी प्राधिकरणाने चौकशी अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे विश्वास पाटील यांना वाचविण्याचा प्राधिकरणाचा तर प्रयत्न नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पाटील यांच्या गतिमानतेचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ३ जुलै २०१७ रोजी दिले होते. त्यानंतर याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. विश्वास पाटील यांच्या काळातील प्रत्येक फाईलीची कमालीची दक्षता म्हणून तपासणी करण्यासही मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानंतर प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी याप्रकरणी प्राधिकरणाचे कायदेशीर सल्लागार आणि निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक चौकशी समिती नेमली होती. या समितीने चौकशी करून ३३ प्रकरणांत गंभीर त्रुटी असल्याचा अहवाल दिला होता. या अहवाल दिल्यानंतर या प्रत्येक प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्राधिकरणाचे सचिव संदीप देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता पाच-सहा महिने होत आले तरी देशमुख यांना जबाबदारी निश्चित करता आलेली नाही. त्यामुळे विविध शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहे. आता ३ जुलै रोजी या गतिमानतेला वर्ष पूर्ण होत आहे. तरी प्राधिकरणाकडून चौकशी पूर्ण होऊ शकलेली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत देशमुख यांना विचारले असता, चौकशी अंतिम टप्प्यात असून आता लवकरच अहवाल सादर केला जाईल, असे त्यांनी सांगितले. मात्र त्यालाही आता दोन-तीन महिने उलटून गेले आहेत. परंतु अद्याप अहवाल सादर झालेला नाही. याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांचा संपर्क होऊ शकला नाही.

याप्रकरणी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी राज्य गुप्तचर विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे प्राधिकरणाकडील चौकशीचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु प्राधिकरणामार्फत चौकशी सुरूच राहील, असे लगेचच  वायकर यांनी जाहीर केले.

या घटनेलाही आता काही महिने उलटले आहेत. जुलै महिन्यात अधिवेशवाला सुरुवात होत आहे.

हा अहवाल अधिवेशनात पटलावर ठेवण्याचे आश्वासनही वायकर यांनी दिले आहे. त्यामुळे आता अधिवेशनापूर्वी ही चौकशी पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रकरणे गंभीरच!

या बहुतांश प्रकरणात चटईक्षेत्रफळाचा घोटाळा करण्यात आला आहे. या घोटाळ्याला प्राधिकरणातील विशेष कार्य अधिकारी, उपमुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता आदींनी साथ दिली आहे. या अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसारच फाईल निकालात काढल्याचा दावा विश्वास पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आता या चौकशीत प्राधिकरणातील समिती काय अहवाल देते, याकडे लक्ष लागून राहिले आहे.