19 November 2017

News Flash

विश्वास पाटील यांची ‘फाइल’ तपासणी कसूनच!

पाटील यांनी निवृत्तीच्या अखेरच्या महिन्यात मोठय़ा प्रमाणात फायली निकालात काढल्या होत्या.

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: September 13, 2017 4:19 AM

विश्वास पाटील ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

‘झोपु’ प्राधिकरणाचा ठाम विश्वास

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्या निवृत्तीच्या काळातील प्रत्येक फाइलीची कसून तपासणी होईलच. एकही फाइल या तपासणीतून सुटणार नाही. जे बेकायदेशीर असेल त्याविरुद्ध कारवाई होईलच, असा ठाम विश्वास झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केला.

‘दीड महिन्यांनंतरही विश्वास पाटील यांच्या ‘फाइल’ तपासणीत दिरंगाई’ असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने मंगळवारी प्रकाशित केले होते. याबाबत कपूर म्हणाले की, पाटील यांनी सेवानिवृत्तीच्या शेवटच्या कालावधीत दाखविलेल्या ‘गतिमान’ कारभाराची तपासणी लांबण्यामागे काही वेगळी कारणे आहे. याबाबत आपण स्वत: समिती नेमली होती. या समितीत आपण नाही. निष्पक्षपातीपणे तपासणी व्हावी, यासाठी आपण हा निर्णय घेतला. या समितीतील एक सदस्य परदेशदौऱ्यावर होते. ते आता परत आले आहेत. त्यामुळे तपासणीच्या कामाला वेग येईल. कुठल्याही प्रकरणात कोणालाही अभय दिले जाणार नाही, असेही कपूर यांनी स्पष्ट केले.

पाटील यांनी निवृत्तीच्या अखेरच्या महिन्यात मोठय़ा प्रमाणात फायली निकालात काढल्या होत्या. या ‘गतिमान’ कारभाराचे वृत्त ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम दिले होते. मुख्यमंत्र्यांनाही या ‘गतिमान’तेची कुणकुण लागल्यामुळे म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांना झोपु प्राधिकरणाची सूत्रे तात्काळ हाती घेण्यास सांगितले होते. म्हैसकर यांनी तात्काळ सूत्रे स्वीकारून पाटील यांनी निकालात काढलेल्या असंख्य फायली ताब्यात घेतल्या. त्यानंतर दीपक कपूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर निवृत्त न्यायाधीशांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली होती; परंतु या समितीने अहवाल सादर न केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अहवाल लवकरच सादर होईल आणि त्याची आपण स्वत: फेरतपासणी करू, असेही कपूर यांनी स्पष्ट केले.

या समितीतील एक सदस्य परदेशदौऱ्यावर होते. ते आता परत आले आहेत. त्यामुळे तपासणीच्या कामाला वेग येईल. कुठल्याही प्रकरणात कोणालाही अभय दिले जाणार नाही.

दीपक कपूर, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपु प्राधिकरण

First Published on September 13, 2017 4:19 am

Web Title: vishwas patil sra scam inquiry on vishwas patil scam