संदीप आचार्य

आगामी काळात जपानमधून मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्रात पर्यटक येऊ शकतात हे लक्षात घेऊन महाराष्ट्रातील जपानी भाषा जाणणाऱ्या सात गाईडना तेथील संस्कृतीच्या अभ्यासाठी एक आठवडय़ाकरता जपानला पाठविण्यात येत असून आज २२ डिसेंबर रोजी हे गाईड जपानला रवाना होत आहेत.

जपानमधील काही शहरांबरोबर मुंबई महापालिका तसेच राज्याच्या पर्यटन विभागाचे ‘भगिनी शहर’ करार झाले असून याअंतर्गत उभय देशांमध्ये पर्यटक पाठविण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. भारतातील, विशेषत महाराष्ट्रातील बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी येथील स्तूप तसेच लेणी पाहाण्यासाठी जपानमधून आगामी काळात मोठय़ा प्रमाणात पर्यटक येणार असल्याचे लक्षात घेऊनच जपानी भाषा जाणणारे गाईडस प्रशिक्षित करण्यात येणार आहेत.

जपानमधील वाकायामा शहरात चार वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा करण्यात आला असून वाकायामा व पर्यटन विभागाअंतर्गत करारानुसार जपानी पर्यटक भारतात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात जपानी भाषा जाणणारे सात गाईड प्रशिक्षित करण्यात आले असून ते जपानला रवाना होणार असल्याचे पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी सांगितले.१९८१ मध्ये जपानमधून भारतात २९,०३२ पर्यटक आले होते. यात वाढ होऊन २०१६ मध्ये दोन लाख आठ हजार जपानी पर्यटक भारतात आले होते.