उंचीचा पेच सुटत नसल्याने मूर्तिकारांकडूनही आमंत्रण नाही; सहा महिन्यांच्या रोजगारावर पाणी

मुंबई : गणेशोत्सवावर हजारो परप्रांतीय कारागिरांच्या कु टुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून (पीओपी) उंच गणेशमूर्ती घडविण्यासाठी इतर राज्यांतून येणाऱ्या कारागिरांनी करोनामुळे गेल्यावर्षी मुंबईकडे पाठ फिरविली होती. यंदा तरी मुंबईत हाताला काम मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु मूर्तीच्या उंचीचा पेच अद्याप सुटला नाही. त्यामुळे यंदाही मूर्तिकारांनी या कारागिरांना अद्याप बोलावलेले नाही. परिणामी, हाताशी आलेला सहा महिन्यांचा रोजगार हुकल्याने या कारागिरांमध्ये निराशेचे वातावरण आहे.

गणेशोत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीची मुंबईसह राज्यात मोठी बाजारपेठ आहे. यासाठी राज्यातील मूर्तिकारांना मोठय़ा प्रमाणात  परप्रांतीय कुशल कारागिरांची गरज भासते. साच्यांमध्ये पीओपी भरणे, त्याला आकार देणे, मूर्ती जोडणे, काथ्या पिंजणे, जोडणी, रंगकाम अशा विविध कामांसाठी दरवर्षी हजारो कारागीर बिहार, उत्तर प्रदेश या भागांतून मूर्तिकारांकडे येतात. जवळपास मे ते ऑक्टोबर असे सहा महिने हे काम चालते. करोनामुळे गेल्यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला. शिवाय करोनामुळे परिस्थिती गंभीर असल्याने हे कारागीर मुंबईत येऊ शकले नाहीत. यंदा तरी मुंबईत कामासाठी जाता येईल अशी त्यांना आशा होती, परंतु अद्याप उंच गणेशमूर्तीना परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईत पोहोचल्यावर काम मिळेलच याची त्यांना शश्वती नाही.

‘राज्यभरात जवळपास पाच हजारांहून अधिक परप्रांतीय कारागीर मूर्तीकामासाठी येतात. त्यापैकी सुमारे दोन हजार कारागीर मुंबईतील गणेश कार्यशाळांमध्ये कार्यरत असतात.  मी दरवर्षी १५० कारागिरांना बिहारमधून बोलावतो. परंतु गेली दोन वर्षे कुणालाही बोलावू शकलो नाही. मोठय़ा मूर्तींना परवानगी नसल्याने आमचा सहा महिन्यांचा रोजगार बुडाला. गावी काम मिळत नाही आणि मुंबईतही येणे शक्य होत नाही. गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून हजारो कारागिरांच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे त्याला खीळ बसता कामा नये,’ असे रणजीत सोडी यांनी सांगितले. ते गेली वीस वर्षे मूर्तिकारांकडे कुशल कामगार म्हणून कार्यरत आहेत.

मातीकाम करून मूर्तिकार मूर्ती घडवत असले तरी भव्य आणि मोठय़ा संख्येने मूर्ती घडविण्यासाठी याच कामगारांवर विसंबून राहावे लागते. पीओपीची उंच मूर्ती घडवणे अत्यंत मेहनतीचे काम आहे. त्यासाठी याच मजुरांची मोठी मदत मूर्तिकारांना होते. परंतु र्निबधांमुळे आम्ही तरी त्यांना काम कुठून देणार? शिवाय या कामगारांनी पर्यायी व्यवसाय शोधले तर येत्या काळात कामगार मिळवणेही मोठी समस्या होऊ शकते. त्यामुळे उंचीवरील निर्बंध उठवणे गरजेचे आहे.   – सतीश वळीवडेकर, मूर्तिकार