पालिका रुग्णालयांतही पासची सक्ती, एका पासवर दोघांनाच प्रवेश

पालिका रुग्णालयांमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी जाणाऱ्या नातेवाइकाला रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात येणारा पास गळ्यामध्ये अडकवणे बंधनकारक करण्यात आले असून विनापास रुग्णालयात फिरणाऱ्या व्यक्तीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सोमवारी पालिका रुग्णालयांच्या अधिष्ठात्यांना दिले. पालिका रुग्णालयांतील सुरक्षा कडक करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टर, परिचारीका, अन्य कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीमुळे ‘मार्ड’ने सोमवारी सामूहिक रजा आंदोलन केले. रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सोमवारी पालिकेच्या सर्व रुग्णालयांतील अधिष्ठात्यांची तातडीची बैठक बोलावली होती. रुग्णालयांतील सुरक्षा अधिक कडक करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. या बैठकीला पालिकेचे वैद्यकीय संचालक आणि केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यावेळी उपस्थित होते.

रुग्णालयातील डॉक्टर, परिचारीका, अन्य कर्मचारी, रुग्ण, त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असावे. कोणी कोणत्या प्रवेशद्वारातून रुग्णालयात यायचे ते रुग्णालय व्यवस्थापनाने निश्चित करावे आणि या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.

रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना एक प्रवेश पास व रुग्णांच्या नातेवाइकांसाठी दोन प्रवेश पास देण्यात येणार असून कोणत्याही परिस्थितीत एका पासवर दोनपेक्षा अधिक नातेवाइकांना रुग्णालयात प्रवेश द्यायचा नाही, अशी सक्त ताकीद करण्यात आली आहे.

रुग्णालयात रुग्णाला भेटण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक नातेवाइकाला वेगवेगळ्या रंगाचे पास देण्यात येणार आहेत. हा पास नातेवाइकाला गळ्यात घालून रुग्णालयात प्रवेश करावा लागणार आहे. पासशिवाय एखादी व्यक्ती रुग्णालयात फिरताना दृष्टीस पडली तर त्याच्याविरोधात कारवाई करण्यात यावी. वेळप्रसंगी अशा व्यक्तीविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. रुग्णालयांमध्ये गरजेनुसार महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाचे सशस्त्र सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतील, असे ते म्हणाले.  पालिकेच्या  सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून वेळोवेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रणाची तपासणी करून रुग्णालयात विनापास फिरताना दिसणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून घ्यावी आणि त्यांच्याविरुद्ध पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे आदेश अजोय मेहता यांनी दिले आहेत.

पालिका रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने त्यांचे नातेवाईक येतात. मात्र आता खासगी रुग्णालयांप्रमाणेच पालिका रुग्णालयात रुग्णाला भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकांना पास देण्यात येणार आहे. एका पासवर केवळ दोन व्यक्तींनाच रुग्णालयात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णालाही त्रास होणार नाही आणि रुग्णालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरेल, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी यासंदर्भात झालेल्या अन्य एका बैठकीनंतर सांगितले.

रुग्णालयांत सुरक्षारक्षकांची जादा कुमक

’ पहिल्या टप्प्यात राज्य सुरक्षा मंडळाचे ४०० सशस्त्र रक्षक शुक्रवारपासून पालिका रुग्णालयात तैनात होणार आहेत.

’ त्यानंतर आणखी ३०० सशस्त्र रक्षक रुग्णालयांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध होणार आहेत.

’ रुग्णालयाच्या आवारामध्येच पोलिसांची छोटी चौकी उभारण्याचा विचार सुरू असून त्याबाबत पोलीस दलाशी चर्चा करण्यात येत आहे.

’ रुग्णालयांसाठी दक्षता समिती स्थापन करण्याची आणि रुग्णालयांमध्ये धोक्याची सूचना देणारा भोंगा (अलार्म) तात्काळ बसविण्याच्या सूचना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली आहे.