दादरमधील जीआरपी पोलिसांनी सोमवारी अंध अल्पवयीन मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या 24 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. अंध मुलीने दाखवलेल्या असामान्य धाडसामुळेच आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. मुलगी दादरहून कल्याणला प्रवास करत असताना ही घटना घडली. मुलीने आरोपीला अक्षरक्ष: गुडघ्यावर आणत पोलिसांच्या हवाली केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी आपल्या वडिलांसोबत अपंगांसाठी राखीव डब्यातून प्रवास करत होती. दादरला रात्री 8.15 वाजता तिने ट्रेन पकडली होती. मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आपण डब्यात बसलो असताना एका व्यक्तीने आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. यानंतर आपण लगेचच आवाज उठवत वडिलांना आणि इतर प्रवाशांना माहिती दिली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी अजिबात घाबरली नाही. उलट तिने आरोपीचा हात पकडून जोरात मुरगळला. मुलीने स्वरक्षणाचे धडे घेतलेले असून कराटेचंही प्रशिक्षण घेतललं आहे. आरोपी तिच्यापेक्षा उंच असूनही तिने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला होता. जोपर्यंत माटुंगा स्थानक येत नाही तोपर्यंत तिने त्याला जाऊ दिलं नाही.

आरोपीचं नाव विशाल सिंह असून जीआरपी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. आरोपी विनातिकीट आणि अपंगांच्या डब्यात प्रवास करत असल्याने आरोपीवर त्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी मुलीच्या धाडसाचं कौतूक केलं आहे. मुलगी इतकी चांगली प्रशिक्षित आहे की, तिने आरोपीचा हात मोडला असता असं पोलिसांनी सांगितलं आहे.