मुंबई : ‘करोनामुक्त झाल्यानंतर विलगीकरणाचा कालावधी संपवून मी कामावर गेलो, त्याच दिवशी मला रक्तद्रव (प्लाझ्मा) दान कराल का असा दूरध्वनी रुग्णालयातून आला. मी अंध असूनही कोणाचा तरी जीव वाचवू शकतो, ही भावना वेगळाच विश्वास देणारी होती. मी तातडीने त्यांना होकार दिला आणि रक्तद्रव देण्यासाठी रुग्णालयात पोहचलो..’ मानखुर्दमध्ये राहणाऱ्या नितेश सोनावणे यांची दुसरा जीव वाचविण्यासाठीची धडपड खूप काही शिकवून जाते.

नितेश यांना मे महिन्यामध्ये करोनाचा संसर्ग झाल्याने नानावटी रुग्णालयात दाखल केले होते. अंध असूनही त्यांना रुग्णालयात विशेष मदतीची गरज तर भासली नाही. शिवाय इतर रुग्णांसाठी त्यांची या आजारासोबत लढण्याची जिद्द प्रेरणादायक होती. रुग्णालयात गंभीर प्रकृतीच्या रुग्णांसाठी रक्तद्रवाची आवश्यकता आहे. त्यातही रुग्णाच्या रक्तगटाशी मिळतेजुळते रक्तद्रव लवकर उपलब्ध होत नाही. त्यात एका ८० वर्षांच्या आजोबांना रक्तद्रव आवश्यक होता. नितेश यांचा रक्तगट त्यांच्याशी जुळणारा असल्याचे त्यांच्याशी रुग्णालयाने संपर्क साधला. थोडीफार माहिती दिल्यानंतर नितेश यांनी लगेचच रक्तद्रव देण्यास होकार दिला. आता आजोबांना रक्तद्रव उपचार देणे शक्य होणार आहे.

माझे अंधत्व मला रक्तद्रव दान करण्यापासून रोखू शकत नाही ही खूप आनंदाची बाब आहे. आता पंधरा दिवसांनी पुन्हा रक्तद्रव दान करणार असल्याचे नितेश यांनी सांगितले.