‘एक व्यक्ती म्हणून माझा शोध सतत सुरू असतो. तो शोध हाच ध्यास बनतो आणि त्यानुसार वाटचाल करत असताना आजूबाजूच्या गोष्टी आपोआप आपल्या ध्येयाला अनुकूल अशा घडत जातात, असाच आजवरचा अनुभव आहे. मात्र, कुठलाही बदल हा आतून व्हावा लागतो आणि त्यासाठी आपला आपल्याशी संवाद वाढत राहणे हेच खरे यश आहे’, यशाचा हा ‘अमृतमंत्र’ अभिनेत्री अमृता सुभाषने सांगताच येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात उपस्थित श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाट केला. निमित्त होते ‘लोकसत्ता’ व केसरी प्रस्तुत ‘व्हिवा लाउंज’ कार्यक्रमाचे. नाटक, मालिका, चित्रपट, लेखन अशा सर्वच आघाडय़ांवर उत्तम कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू अभिनेत्री अमृता सुभाष हिच्याशी ‘लोकसत्ता’ व केसरी प्रस्तुत ‘व्हिवा लाउंज’ कार्यक्रमात गुरुवारी रंगलेल्या गप्पांमध्ये अमृताने तिचा अभिनय प्रवास उलगडला.
ज्योती सुभाष यांच्यासारख्या सक्षम अभिनेत्रीची अवखळ मुलगी ते ‘किल्ला’ या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या चित्रपटापर्यंत प्रेक्षकांनी पाहिलेली, त्यांना जाणवलेली संवेदनशील अभिनेत्री अमृता सुभाष हा प्रवास सोपा नव्हता; पण या एकूणच जगण्याच्या प्रवासामध्ये आपल्याला कळलेली यशाची व्याख्या, अभिनेत्री म्हणून खाचखळग्याच्या वाटेवरून प्रवास करताना लागलेली ठेच आणि तरीही वेळोवेळी मिळालेल्या योग्य मार्गदर्शनामुळे समृद्ध होत गेलेले दिवस असा प्रेरणादायी ‘अमृतानुभव’ गुरुवारी दादर (पश्चिम) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात उपस्थितांना ऐकायला मिळाला.
लहानपणापासून सादरीकरणाचे असलेले आकर्षण, कलाकार म्हणून रंगमंचावर सादरीकरण करत असताना आपल्याला कुठलीही लाज न बाळगता व्यक्त होता येते याची झालेली जाणीव पुढे कलाकार म्हणून घडत गेलेल्या प्रवासाची सुरुवात ठरली, असे तिने सांगितले. या प्रवासात पहिली गुरू आई होती. त्यानंतर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर पं. सत्यदेव दुबे, नसीरुद्दीन शहा, वामन केंद्रे यांच्यासारख्या गुरूंच्या मिळालेल्या मार्गदर्शनामुळे दर वेळी अवघड वळणावर सावरण्याची, पुढे जाण्याची संधी कशी मिळत गेली हे ओघवत्या गप्पांमध्ये अमृताने सांगितले.
नैराश्य हा मानसिक आजार..
अभिनेत्री म्हणून अपयशाला सामोरे जाताना आलेले नैराश्य आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांविषयी अमृताने आवर्जून सांगितले. नैराश्य हा मानसिक आजार असून त्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. मानसोपचारतज्ज्ञांकडे जाण्याविषयी असलेले गैरसमज काढून टाकून शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, असेही तिने आग्रहाने सांगितले. कारकीर्दीत चित्रपट करायचा की मालिका इथपासून ते यश म्हणजे काय, मनाची श्रीमंती म्हणजे काय, याच्या कुठल्याही ढोबळ व्याख्या न करता रोजच्या जीवनानुभवातून विचारांची दिशा ठरवणे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश कसा मिळवायचा याची तांत्रिक माहिती ते कलाकार म्हणून ते कसे घडविले जाते अशा अनेक गोष्टींची तपशीलवार माहिती अमृताने दिली. ‘दिशा डायरेक्ट’च्या सहकार्याने अमृताशी रंगलेल्या या गप्पांचा सविस्तर वृत्तान्त पुढील शुक्रवारी ‘लोकसत्ता-व्हिवा’ पुरवणीत वाचता येणार आहे.