आठवडय़ाची मुलाखत :  विवेक सिंग

सह-व्यवस्थापकीय संचालक, प्रोकॅम इंटरनॅशनल

मुंबईच्या स्वभावाला साजेसा असा वेगाचा सागरी थरार या आठवडय़ात मरीन ड्राइव्हच्या किनाऱ्यावर अनुभवायला मिळणार आहे. निमित्त आहे, समुद्रांच्या लाटा झेलत प्रति तास १०० किलोमीटरहून अधिक तुफान वेगाने धावणाऱ्या ‘पॉवर बोट’ स्पर्धेचे. ही जगातली पहिली अजिंक्यपद स्पर्धा आहे. त्याचे पहिले यजमानपद मुंबईला मिळाले असून संपूर्ण जगाचे लक्ष या स्पर्धेकडे असणार आहे. या निमित्ताने स्पर्धेचे आयोजक असलेल्या प्रोकॅम इंटरनॅशनल संस्थेचे सह-व्यवस्थापकीय संचालक विवेक सिंग यांच्याशी साधलेला हा संवाद.

’ या स्पर्धेच्या आयोजनामागचे नेमके उद्दिष्ट काय?

‘नेक्सा पी १ पॉवरबोट इंडियन ग्रां. प्री. ऑफ द सीज’ हा केवळ बोटींच्या स्पर्धेचा कार्यक्रम नाही. तर, या स्पर्धेच्या आयोजनातून आम्हाला ‘जॉय ऑफ वॉटर’ ही संकल्पना नागरिकांच्या मनावर बिंबवायची आहे. हल्ली नागरिक शहरातील समुद्रकिनाऱ्याशी स्वत:ला जोडून घेताना दिसत नाहीत. समुद्रकिनारी केवळ फिरायला यायचे या चाकोरीबद्धतेतून पर्यटकांना आणि सामान्यांनाही बाहेर काढायचे असून त्यांना नवे काही तरी देण्याचा आमचा हेतू आहे. किनारपट्टीपासून लांब चाललेल्यांना आम्हाला पुन्हा किनारपट्टीशी जोडायचे आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्र आलेल्यांकरिता आम्ही सागरी जैवविविधतेचा संदेश व त्याबाबत जनजागृती करणार आहोत.

’ या स्पर्धेचे वैशिष्टय़ काय आहे?

‘युनियन मोटोनॉटिक  मॅनेजमेंट’ (यूआयएम) या पॉवर बोट स्पर्धामधील जागतिक संस्थेच्या सहकार्याने ही ‘नेक्सा पी १ पॉवरबोट इंडियन ग्रां. प्री. ऑफ द सीज’ स्पर्धा पार पडणार आहे. ही जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आहे. पी १ पॉवरबोटींची स्पर्धा जगभरात सगळीकडे होते. मात्र, त्याची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा आतापर्यंत झालेली नाही. ही स्पर्धा मुंबई व भारतातच नव्हे तर जगभरात पहिल्यांदा होत आहे. यानंतर ही स्पर्धा इंग्लंड व अमेरिकादी देशांमध्ये होईल. पण, जागतिक स्पर्धेचे यजमानपद भारताला प्रथम मिळाले आहे. त्यामुळे मुंबईकरिता हे या स्पर्धेचे मुख्य वैशिष्टय़ आहे.

’ स्पर्धेचे स्वरूप नेमके कसे आहे?

जगभरातील नामांकित स्पर्धा जिंकलेले बोटचालक व दिशा-मार्गदर्शक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यात सहभागी होणाऱ्या पॉवरबोट या एकाच स्वरूपाच्या आहेत. म्हणजे या स्पर्धेतील प्रत्येकाकडे असलेली बोट ‘पँथर पी – २५२’ या एकाच कंपनीची आहे. त्यामुळे त्यांचे इंजिन एकसारखे असल्याने स्पर्धेदरम्यान कोणावरही अन्याय होणार नाही. त्यामुळे अशा स्पर्धेत जिंकणे हे बोटचालकाची व दिशा-मार्गदर्शकाची चलाखी व कसब यांवर अवलंबून आहे. इंग्लंड, बेल्जियम, अमेरिका आदी राष्ट्रांतील नामवंत पॉवरबोटचालक यात सहभागी होणार आहेत. या बोटींचा कमाल वेग हा ताशी ११३ किलोमीटर राहणार आहे. एकावेळी १२ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतील. प्रत्येक बोटीत बोटचालक व दिशा-मार्गदर्शक असे दोघे जण असतील. ही शर्यत ५.२ किलोमीटरची असेल. ३ ते ४ मार्चदरम्यान ही स्पर्धा मरीन ड्राइव्ह येथे पार पडणार असून पहिले दोन दिवस प्राथमिक फेरी व उपांत्य फेरी होईल. त्यानंतर रविवारी अंतिम फेरी पार पडेल. तत्पूर्वी स्पर्धकांना सरावाची संधी मिळणार आहे. १२५ हजार अमेरिकी डॉलर एवढी मोठी रक्कम विजेत्यांना पारितोषिक स्वरूपात दिली जाणार आहे.

’ या स्पर्धेसाठी सुरक्षेचे नियोजन कसे केले आहे?

सध्या पॉवर बोट या नौदलाच्या इंडियन वॉटरमेंट शिप येथे उभ्या करण्यात आल्या आहेत. तसेच, ही स्पर्धा भारतीय नौदलाच्या सहकार्यानेच पार पाडली जात आहे. या शिवाय मुंबई पोलीस व महाराष्ट्र सरकार आदींची आम्हाला साथ मिळाली आहे. तसेच आमचे कर्मचारी व कार्यकर्ते हे मोठय़ा संख्येने घटनास्थळी उपस्थित राहणार असून त्यांना हरतऱ्हेची परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षेची कोणती काळजी करण्याची आवश्यकता सध्या तरी नाही.

’ स्पर्धेने मुंबईतील सागरी किनारे प्रदूषित होतील असे वाटते का?

या स्पर्धेने सागरी किनारे अजिबात प्रदूषित होणार नाहीत. उलट गेले काही दिवस मुंबईतील किनारे स्वच्छ व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून सागरी परिसंस्था बचाव व संवर्धनाचा संदेश देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. यासाठी गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकत्र करून सागरी किनारे सफाईची मोहीम राबवत आहोत. यात आम्ही दर वेळी मुंबईतील एका किनाऱ्याची निवड करतो. दिवसभर हे किनारे स्वच्छ केले जातात. आतापर्यंत गिरगाव चौपाटी, मरीन ड्राइव्ह येथे स्वच्छता करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी आम्ही १५० महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या साथीने मुंबईतील चिंबई किनाऱ्याची सफाई केली. आपले किनारे स्वच्छ करणे हे उद्दिष्ट आम्ही या स्पर्धेच्या आयोजनातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. समुद्रकिनारा मानवी मनाला आनंद देतो. जगभरात सागरी किनारे ज्या पद्धतीने विकसित केले आहेत, तसे ते मुंबईतही व्हावेत असे आम्हाला वाटते. जेणेकरून त्यांनाही शहराला लाभलेल्या विस्तृत किनाऱ्यांचा खऱ्या अर्थाने आनंद घेता येईल.