मुंबईतील व्हिजेटीआय महाविद्यालयाच्या परिसरात ‘स्पेशल डेज’ साजरे करण्यावर संचालकांनी बंदी घातल्याने अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी महाविद्यालयाच्या या निर्णयावर कडाडून टीका केली आहे. महाविद्यालयातर्फे अशी बंदी घालणे योग्य नसून, विद्यार्थ्यांच्या स्वातंत्र्यावर हा घाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. व्हिजेटीआय महाविद्यालयाच्या संचालकांतर्फे महाविद्यालयाच्या परिसरात ‘स्पेशल डेज’ साजरे करण्यास बंदी असलेले पत्रक जारी करण्यात आले आहे. काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी याचे समर्थन केले असले, तरी काहींनी याच्या विरोधात भूमिका मांडली आहे. या विषयी बोलताना प्रहार विद्यार्थी संघटनेचे अॅ. मनोज टेकाडे म्हणाले, कॉलेजच्या परिसरात साजरे होणाऱ्या या ‘स्पेशल डेज’च्या निमित्ताने विद्यार्थी नवीन मित्र बनवतात. अशाप्रकारचे ‘स्पेशल डेज’ साजरे करण्यावर संस्थेतर्फे घालण्यात आलेली बंदी ही असमर्थनीय आहे. शिस्तीचे पालन करणे म्हणजे विद्यार्थ्यांनी बाह्यउपक्रमात भाग न घेणे असा अर्थ होत नाही. व्हिजेटीआयचे संचालक विद्यार्थ्यांवर असे अन्यायकारक बंधन घालू शकत नाहीत.
विद्यार्थ्यांसमवेत महाविद्यालयातील शैक्षणिक सत्राची आणि बाह्यउपक्रमांची सांगड घालण्याची जबाबदारी संस्थेच्या प्रमुखांची असल्याचे मत विद्याविहार येथील के. जे. सोमया माहाविद्यालयाचे प्राचार्य विजय जोशी यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, महाविद्यालयाच्या परिसरात होणाऱ्या अशा उपक्रमांना बंदी घालणे हा यावरील उपाय नाही. निश्चितच अभ्यास हा महत्वाचा आहे आणि शैक्षणिक सत्राला धक्का न लागणे हे देखील खरे आहे. असे असले तरी, अशा उपक्रमांना बंदी घालणे योग्य नाही, यातुनच विद्यार्थी अनेक नव्या गोष्टी शिकत असतात. उत्तम कल्पना या क्लासरुममध्ये न येता कॉफी टेबलावर येतात यावर माझा विश्वास आहे. प्राचार्य आणि संस्थेच्या प्रमुखांनी वेळेत नियोजन करून अभ्यासाचे नुकसान न होता विद्यार्थ्यांना अशाप्रकारचे उपक्रम करण्याचे स्वात्यंत्र मिळेल याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे.
परंतु, वांद्रे येथील आर. डी. नॅशनल कॉलेजचे प्राचार्य दिनेश पुंजवानी यांनी दुसरी बाजू मांडली. ते म्हणाले, अनेकवेळा विद्यार्थी महाविद्यालयाला दांडी मारून सर्व लक्ष बाहेरील जास्तीच्या शिकवणीवर केंद्रीत करतात. शैक्षणीक सत्राचे पालन करणे संस्थेसाठी कठीण होऊन बसते. विद्यार्थी वर्गात सुध्दा मित्र बनवू शकतात आणि एकमेकांशी संपर्क साधू शकतात. ते सांस्कृतिक आणि क्रिडा उपक्रमात भाग घेऊ शकतात. अनेक विद्यार्थी त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैर वापर करतात. अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी महाविद्यालयाकडेदेखील फार कमी कालावधी असतो. या ‘स्पेशल डेज’दरम्यान अनेक विद्यार्थी वर्गात उपस्थित राहात नाहीत. त्याच्या शैक्षणीक भविष्याविषयी आम्हाला काळजी असल्या कारणाने असे कठोर निर्णय घेणे आम्हाला क्रमप्राप्त होते.