‘व्हीजेटीआय’मधील अध्यापकांचा सवाल
नॅनो इंजिनीयरिंगचा अभ्यासक्रम व्हीजेटीआयमध्ये सुरू व्हावा या जिद्दीतून परदेशातील ७० हजार डॉलरच्या नोकरीवर पाणी सोडून भारतात परतलेल्या डॉ. दत्ताजी शिंदे यांच्यावरील अन्यायाची कहाणी ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर केवळ व्हीजेटीआयच नव्हे तर एकूणच अध्यापन क्षेत्रात त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. व्हीजेटीआयमधील आजी-माजी अध्यापक तसेच विद्यार्थ्यांनी डॉ. शिंदे यांना तात्काळ पदोन्नती देण्याची मागणी करत हेच का ‘तुमचे मेक इन महाराष्ट्र’ असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
डॉ. दत्ताजी शिंदे हे दलित असल्यामुळेच त्यांच्यावर अन्याय करण्यात आल्याचे येथील काही अध्यापकांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्येही तीव्र असंतोष निर्माण झाला असून अध्यापकांनी डॉ. शिंदे यांच्या समर्थनार्थ आंदोलन केल्यास त्याला साथ देऊ असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. व्हीजेटीआयमधील प्राध्यापकांव्यतिरिक्त ‘सिटिझन फोरम’, प्रहार विद्यार्थी संघटना, टेफनॅप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेनेही डॉ. शिंदे यांच्यावरील अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे. तुमचा वेमुला होऊ देऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे प्रहार विद्यार्थी संघटनेचे अ‍ॅड. मनोज टेकावडे व अ‍ॅड. तापकीर यांनी सांगितले, तर डॉ. शिंदे यांच्यासाठी मी स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन अन्याय दूर करण्यासाठी पाठपुरावा करीन असे सिटिझन फोरमचे प्रमुख व भाजप आमदार संजय केळकर यांनी सांगितले. दरम्यान, राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. सु. का. महाजन यांना याबाबत विचारले असता या सर्व प्रकरणाची मी तात्काळ माहिती घेऊन वस्तुस्थिती संबंधितांना सादर करणार आहे, असे त्यांनी सांगितले. २००८ पासून डॉ. शिंदे व्हीजेटीआयमध्ये अध्यापक आहेत. २०११ मध्ये अमेरिकेला पीएचडीसाठी गेले होते व तेथून २०१५ ला ते परत आले. व्हीजेटीआयमध्ये असताना परीक्षा नियंत्रकापासून विविध जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या असून त्यांचे सात शोधप्रबंधही प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या ज्ञानाचा फायदा व्हीजेटीआयला मिळाला पाहिजे, असे मतही डॉ. महाजन यांनी व्यक्त केले.

‘लोकसत्ता’च्या वृत्ताची दखल
संपूर्ण देशात जो अभ्यासक्रम नाही, त्या नॅनो इंजिनीयरिंग विषयात अमेरिकेत जाऊन पीएच.डी. करून पुन्हा ते शिक्षण भारतातील विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी परतलेल्या डॉ. शिंदे यांच्यावर व्हीजेटीआय व्यवस्थापनाने अन्याय केला, एवढेच नव्हे तर त्यांना न्यायासाठी न्यायालयात जायला भाग पाडले. डॉ. शिंदे यांनी आपल्यावरील अन्यायाची माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे तसेच मंत्री विनोद तावडे यांच्यासह सर्व संबंधितांना पत्राद्वारे कळवली होती. मात्र कोणीही त्यांना मदत केली नाही. ‘लोकसत्ता’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच व्हीजेटीआयमधील माजी अध्यापक डॉ. सुरेश नाखरे यांच्यासह अनेक अध्यापकांनी तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणी न्याय देण्याची मागणी केली.