23 July 2019

News Flash

‘एमटीएनएल’मध्ये स्वेच्छानिवृत्ती?

खर्चकपातीसाठी दूरसंचार विभागाला प्रस्ताव

(संग्रहित छायाचित्र)

|| निशांत सरवणकर

खर्चकपातीसाठी दूरसंचार विभागाला प्रस्ताव

‘महानगर टेलिफोन निगम’ला कर्जाच्या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च कमी करण्याच्या हेतूने ५० वर्षे वयावरील कर्मचाऱ्यांना गुजरातच्या धर्तीवर स्वेच्छानिवृत्ती देण्याचा प्रस्ताव दूरसंचार विभागाला सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी लवकरच पाठविला जाणार आहे.

‘एमटीएनएल’च्या मुंबई आणि दिल्लीमधील २३ हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनावर निगमच्या महसुलातील तब्बल ९० टक्के रक्कम खर्च होते. दर तिमाहीला निगमला केवळ वेतनापोटी ५००हून अधिक कोटींचा तोटा सोसावा लागतो. महसूल कमी असल्यामुळे कर्जाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय व्यवस्थापनासमोर उरलेला नसून एव्हाना हा कर्जाचा बोजा १९ हजार कोटींवर पोहोचला आहे. नोव्हेंबर महिन्याचे वेतन देण्यासाठी एमटीएनएलच्या तिजोरीत पैसे नसल्याने पहिल्यांदाच वेतन लांबविण्यात आले. या संदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’ने सर्वप्रथम दिले. यावर तोडगा काढण्यासाठी व्यवस्थापनाकडून स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव तयार केला जात असल्याचे वृत्तही ‘लोकसत्ता’ने दिले होते. अखेरीस हा प्रस्ताव तयार करून तो दूरसंचार विभागाकडे पाठविण्यात आला आहे.

टेलिफोन निगम कर्मचारी संघ तसेच टेलिफोन निगम युनायटेड फोरमने एमटीएनएलच्या गंभीर आर्थिक परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. संघ तसेच फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी स्वंतत्रपणे एमटीएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार यांची दिल्लीत भेट घेऊन याबाबत चर्चा केली.

केंद्राची मंजुरी मिळाल्यास स्वेच्छानिवृत्ती योजना लागू होईल. ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे नऊ हजार कर्मचारी आहेत. या पैकी अनेक कर्मचाऱ्यांना द्यायला कामच नाही.  भारत संचार निगममध्ये एमटीएनएलच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावाचाही विचार वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी सांगितले.

स्वेच्छानिवृत्तीचे स्वरूप

  • ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या कर्मचाऱ्यांना लागू
  • सेवेच्या प्रत्येक वर्षांसाठी ३५ दिवसांचे वेतन आणि उर्वरित सेवेच्या प्रत्येक वर्षांसाठी २५ दिवसांचे वेतन इतकी रक्कम
  • सेवानिवृत्तीसाठी शिल्लक असलेल्या वर्षांतील एकत्रित वेतन यापेक्षा कमी असेल तर ती रक्कम गृहीत धरणार
  • एक हजार कोटींचा भरुदड पडणार

First Published on December 7, 2018 1:28 am

Web Title: voluntary retirement in mtnl