‘आयसीएमआर’ला सूचित करूनही कार्यवाही प्रलंबितच

मुंबई : लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देण्याबाबत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेला (आयसीएमआर) सूचित करून एक महिना उलटत आला तरी अद्याप या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही. त्यामुळे दोन्ही मात्रा पूर्ण करूनही रेल्वे प्रवासासह अन्य सुविधांपासून स्वयंसेवक वंचित राहिले आहेत.

मुंबईत झालेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या लस चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या असूनही केंद्रीय आरोग्य विभागाचे लसीकरण प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यामुळे स्वयंसेवकांना रेल्वे प्रवासासह अनेक ठिकाणी अडचण येत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने १९ ऑगस्टला प्रसिद्ध केले होते.

गेले महिनाभर आम्ही रुग्णालयाकडे वारंवार पाठपुरावा करत आहोत. ३० ऑगस्टला प्रमाणपत्र दिले जाईल, असे आम्हाला सांगण्यात आले होते. परंतु आता त्यालाही आठ दिवस झाले तरी आम्हाला प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही. नोकरीसाठी आम्हा स्वयंसेवकांना रेल्वे प्रवास सोईचा आहे. परंतु प्रमाणपत्र नसल्यामुळे रेल्वेने आम्हाला मासिक पास देण्यास नकार दिला आहे. आम्ही स्वत:हून पुढाकार घेत चाचण्यांमध्ये सहभागी झालो. परंतु आता आमच्याच मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे मत स्वयंसेवक संतोष जगधने यांनी व्यक्त केले. ‘ज्या स्वयंसेवकांना लस दिली गेली, त्याची यादी आम्ही आयसीएमआरला पाठविली आहे. आयसीएमआरसह केंद्रीय आरोग्य विभागालाही प्रमाणपत्र देण्याबाबत पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यांनी ३० ऑगस्टपर्यंत याबाबत कळविले जाईल, असे उत्तरही दिले होते. परंतु आता हा कालावधी उलटून गेला तरी त्यांनी अद्याप काही कळविलेले नाही. आयसीएमआरला पुन्हा यासंबंधी पत्र लिहिले जाईल, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

‘आम्हालाच देण्यात दिरंगाई का?’

काही स्वयंसेवकांना प्रमाणपत्र मिळाली आहेत, परंतु आमच्या गटात जवळपास ६० जण असून आम्हाला प्रमाणपत्र दिलेली नाहीत. याचा अर्थ प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आम्हालाच ते देण्याबाबत दिरंगाई का, असा प्रश्न स्वयंसेवकांनी उपस्थित केला आहे.