कोणत्याही इतर आरक्षणाला धक्का न लावता, ओबीसी संर्वगात २५ टक्के आरक्षण सरकाराने येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मंजूर न केल्यास सत्ताधारी पक्षाच्या विरोधात गावोगावी जाऊन मतदान करण्याचा प्रचार करण्यात येईल, असा इशारा मराठा आरक्षण चळवळीचे नेते आमदार विनायक मेटे यांनी वाशी येथील एका कार्यक्रमात दिला. आमचा विचार केला नाही तर आम्ही तुमचा विचार करणार नाही, असे त्यांनी या वेळी सत्ताधारी पक्षाला ठणकावले.
मेटे यांच्या शिवसंग्राम संघटनेच्या वतीने १ डिसेंबर रोजी पनवेल येथे मराठा आरक्षण महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी मेटे सध्या नवी मुंबई, पनवेल, खोपोली, या परिसरात सभा घेत आहेत. वाशी येथील मराठा समाज सभागृहात झालेल्या सभेत त्यांनी हा इशारा दिला. राज्यात मोठय़ा प्रमाणात असणाऱ्या मराठा समाजात खूप मोठे मागासलेपण आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची निंतात गरज असल्याचे मत त्यांनी या वेळी मांडले. आमच्यासाठी नाही निदान आमच्या मुलामुलींसाठी तरी आरक्षण द्या, असे त्यांनी सांगितले. कोणाच्याही आरक्षणला धक्का न लावता आरक्षण मागत असताना प्रकाश आंबेडकरांसारखे नेते आरक्षणाला विरोध करून समाजात तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केले. शासनाने समिती स्थापन केली आहे पण त्या समितीकडून सर्वेक्षणाचे काम होऊ शकलेले नाही. त्यामुळे संघटनेलाच सर्वेक्षणाचे करावे लागणार आहे. सरकारला निवडणुकीपूर्वीची भाषा समजत असल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आंदोलन हाती घेण्यात आले आह़े आता आरक्षण मिळाल्याविना आंदोलन थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.