विद्यार्थ्यांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी यासाठी येत्या काळात महाविद्यालयांमध्येच मतदार नोंदणी केली जाणार आहे. या संदर्भातील आवश्यक ती सर्व सूचना विद्यपीठातर्फे महाविद्यालयांना देण्यात आली आहे.
महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय हे १८पेक्षा जास्त असते. यामुळे महाविद्यालयांमध्येच त्यांची मतदार नोंदणी केल्यास सरकारचे काम हलके होईल. मतदार नोंदणी करण्यात उदासीनता दिसत असल्याने हा उपाय राज्य सरकारने अवलंबावा, त्यामुळे मतदार नोंदणीचे प्रमाण वाढण्यास मदत होईल, अशी मागणी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आली. या संदर्भात मनविसेच्या शिष्टमंडळाने बुधवारी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात मनविसेचे उपाध्यक्ष चेतन पेडणेकर, अमोल रोग्ये, उजाला यादव, अमोल खानविलकर आदींचा समावेश होता. शिष्टमंडळाच्या मागणीचे स्वागत करून देशमुख यांनी महाविद्यालयांना तशा सूचना देणार असल्याचे स्पष्ट केले.