राज्यातील १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी आज, शुक्र वारी मतदान होत असून, राज्याच्या ग्रामीण भागाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष व नेत्यांनी सर्व ताकद पणाला लावली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून ग्रामीण भागातील ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने या निवडणुकीचा कौल सत्ताधाऱ्यांसाठी महत्त्वाचा असेल. मतमोजणी सोमवारी होईल. राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका या राजकीय पक्षांच्या चिन्हांवर लढवल्या जात नाहीत. यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हे समजत नाही. सर्वच राजकीय पक्षांकडून आम्हीच जास्त जागा जिंकल्या, असा दावा केला जातो. तसेच राजकीय पाया भक्कम करण्यासाठी सर्वच राजकीय नेते आपापल्या भागांमधील निवडणुकांमध्ये लक्ष घालतात. खासदारकी आणि आमदारकीसाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायती ताब्यात असणे राजकीय नेत्यांसाठी आवश्यक असते. त्यामुळे या वेळीही सर्वच नेत्यांनी आपापल्या भागांमधील निवडणुका प्रतिष्ठेच्या के ल्या आहेत.

राळेगणसिद्धी, हिवरे बाजारची परंपरा खंडित

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी, पोपट पवार यांच्या हिवरे बाजारसह काही गावांमध्ये निवडणुका वर्षांनुवर्षे बिनविरोध होत आल्या आहेत.

करोनामुळे गावप्रवेश नाकारलेल्या स्थलांतरित मतदारांसाठी पायघडय़ा..

* करोनाकाळात ज्या गावपुढाऱ्यांनी बाहेरगावी राहणाऱ्या ग्रामस्थांना गावात प्रवेश नाकारला, त्याच पुढाऱ्यांवर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांपुढे पायघडय़ा घालण्याची वेळ आली आहे. परगावी राहणाऱ्या मतदारांनी मतदानासाठी यावे म्हणून मोटारींचीही सोय केली जात आहे.

* शहरांत करोनाचा फैलाव झपाटय़ाने होऊ लागताच मोठय़ा शहरांतून नोकरदार लोंढेच्या लोंढे गावांकडे धावू लागले. प्रत्येकाला गावशिवारात सुरक्षित राहण्याची घाई होती, तर ग्रामस्थांना शहरातून येणाऱ्या या लोंढय़ामुळे गावात साथ पसरण्याची धास्ती. या विचित्र परिस्थितीमुळे राज्यातील अनेक गावांच्या वेशींवर संघर्षांचे प्रसंग उभे राहिले होते. त्यातून एकाच गावात स्थानिक आणि बाहेरचे असे दोन गट पडले. गावचे रस्ते बंद केले गेले. प्रवेश नाकारणे, गावाबाहेर १४ दिवस राहण्याची सक्ती, मंदिर, शाळेत विलगीकरण, गावातून मदत नाकारणे अशा प्रकारांमुळे गावोगावी या दोन गटांत दरी तयार झाली.

* नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच गावोगावच्या पंचायत निवडणुका जाहीर झाल्या. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एक मतही मोलाचे ठरते. मतदार यादीत नाव असलेल्या मात्र नोकरीधंद्यानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे मतदार यादीतील प्रत्येक नावाचा पाठपुरावा केला जात आहे. प्रत्येक मतदाराशी संपर्क साधून मतदानासाठी आर्जवे सुरू झाली आहेत. परंतु, हात जोडून मते मागणाऱ्या पुढाऱ्यांना मतदार आता त्यांच्या त्या वेळच्या वागणुकीचे स्मरण करून देत आहेत.

१४,२३४ ग्रामपंचायती

४६,९२३ प्रभाग

१,२४,८१० जागा

उमेदवार : अडीच लाखांहून अधिक