छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये झालेल्या विक्रमी मतदानामुळे भाजप आणि काँग्रेसचे धुरिण डोके  खाजवीत एकूणच अंदाज घेत आहेत. जास्त मतदान हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील कौल, असे सर्वसामान्य मानले जाते.
राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विक्रमी ७५ टक्के मतदान झाले. मध्य प्रदेशमध्ये ७० टक्के मतदान झाले असले तरी या राज्याच्या इतिहासात एवढे  मतदान पहिल्यांदाच झाले आहे. विक्रमी मतदान म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल हे गणित असले तरी तसेच होते असे नाही. गेल्या वर्षी गुजरातमध्ये ७२ टक्के मतदान झाले होते. तेव्हा भाजपने सत्ता कायम राखली होती. १९९५ मध्ये महाराष्ट्रात विक्रमी ८० टक्क्यांच्या आसपास मतदान झाले होते व तेव्हा काँग्रेसचा पराभव होऊन शिवसेना-भाजपची सत्ता आली होती. अलीकडेच कर्नाटकमध्ये ७० टक्के मतदान झाले व तेव्हा सत्ताबदल झाला होता.  तीन राज्यांमध्ये झालेले विक्रमी मतदान हा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर दाखविण्यात आलेला विश्वास असल्याचा दावा भाजपच्या वर्तुळातून करण्यात येत आहे. छत्तीसगडमध्ये झालेले विक्रमी मतदान हे सत्ताधारी भाजपच्या विरोधात असल्याचा दावा काँग्रेसचे नेते करीत आहेत. राजस्थानमधील विक्रमी मतदान हे काँग्रेसच्या विरोधातील मतदान असल्याचा दावा करण्यात येत आहे. मध्य प्रदेशात सत्ताबदल होईल, असा दावा काँग्रेसच्या गोटातून करण्यात येत असला तरी भाजप सत्ता कायम राखेल हा भाजपचा दावा आहे.
छत्तीसगडमध्ये विक्रमी मतदानामुळे सत्तेच्या चाव्या कोणाकडे जातात याबाबत उत्सुकता आहे. छत्तीसगडमध्ये सत्ता संपादनाकरिता चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.