आक्रसलेले हरित क्षेत्र आणि वाढत्या  विकासकामांमुळे मुंबईतील पक्ष्यांचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यात गिधाड, लावा (लावरी), चंडोल, धोबी, रानकोंबडी आणि तिरचिमणी सारखे पक्षी शहरातून हद्दपार झाल्याचे ‘मुंबई बर्ड रेस’ या उपक्रमाच्या सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या पक्षी निरीक्षणाचा अहवाल जाहीर झाला.

मुंबई महानगर प्रदेशातील पक्ष्यांच्या प्रजातींची गणना करण्याच्या उद्देशाने गेली १४ वर्षे ‘मुंबई बर्ड रेस’चे आयोजन  होत आहे. यंदा पार पडलेल्या या उपक्रमात २३४ पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली. मात्र ही संख्या गेल्या चार वर्षांतील आकडेवारीपेक्षा कमी आहे. हिवाळ्यात मोठय़ा संख्येने पक्ष्यांचे स्थलांतर होत असल्याने दरवर्षी या उपक्रमांतर्गत एक दिवसाचा पक्षीनिरीक्षण केले जाते. यात हौशी पक्षीनिरीक्षक आणि सामान्य नागरिक सहभाग घेतात. यंदा या मोहिमेत ३७८ लोकांनी सहभाग घेतला होता. त्यांचे विभाजन ५० गटांमध्ये करुन रविवारी पक्षीनिरीक्षणाचा कार्यक्रम पार पडला. यावेऴी लोकांनी मुंबई महानगर प्रदेशातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्य सारखे हरितक्षेत्र, पाणथळ जागा आणि शहरी भागात पक्षीनिरिक्षण केले.

या माध्यमातून जमविण्यात आलेल्या माहितीतून मुंबईतील पक्ष्यांच्या प्रजातींमधील ढासळते वास्तव समोर आले आहे. यंदा गिधाड, लावा, चंडोल, धोबी, रानकोंबडी आणि तिरचिमणी पक्ष्यांचे दर्शन  घडलेले नाही.

या मोहिमेत गेल्या पाच वर्षांत गिधाड आणि लाव पक्ष्यांचे दर्शन पक्षीनिरीक्षकांना झालेले नाही. त्यामुळे हे पक्षी शहरातून हद्दपार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर काळा गरुड, भारतीय निळा दयाळ आणि पिवळी रामगंगा यासारख्या पक्ष्यांचे दर्शन घडले.

गेल्या दहा वर्षांत मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रांमधील पक्ष्यांच्या अधिवासावर मोठा परिणाम झाला आहे. गोडय़ा पाण्याची पाणथळ क्षेत्रे आणि गवताळ  प्रदेशाची मोठय़ा प्रमाणात हानी झाल्याचे निरीक्षण यंदाच्या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

– संजोय मोंगा, आयोजक, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक