मतदान यंत्रांमध्ये फेरफार करण्यात येत असल्याच्या आरोपांच्या पाश्र्वभूमीवर व्होटर व्हेरिफेबल पेपर ऑडिट ट्रायल (व्हीव्हीपॅट) यंत्रे मतदानासाठी वापरण्याचा राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये पहिल्यांदा वापर करण्याचा नांदेडमधील प्रयोग यशस्वी ठरला आहे. कारण मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट या दोन्हींमधील मते समसमान मोजली गेली.

व्हीव्हीपॅट म्हणजेच मतदान यंत्रावर कळ दाबल्यावर आपले मत कोणाला दिले याची चिठ्ठी समोर मतदान यंत्रावर दिसते. भविष्यात सर्व निवडणुकांमध्ये ही यंत्रे वापरण्यात येणार आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही या यंत्रांचा वापर केला जाईल. राज्यात बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने तशी यंत्रे बनवावी लागणार आहेत. नांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र. २ या मतदारसंघातील ३७ मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला होता.

मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट या दोन्हींमधील मतांमध्ये १०० टक्के समानता आढळल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी शेखर चन्ने यांनी सांगितले. प्रत्येक टेबलवर व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठय़ा आणि मतदान यंत्रे यातील मते मोजण्यात आली. सर्वत्र चिठ्ठय़ा आणि मतदान यंत्रांतील मते यामध्ये समानता आढळली. फक्त सकाळी १० वाजता सुरू झालेली या प्रभागातील मतमोजणी मध्यरात्री २ वाजता संपली. यामुळेच नांदेडचा संपूर्ण निकाल जाहीर होण्यास मध्यरात्र उजाडली.

विधानसभेत प्रयोग यशस्वी

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील १३ विधानसभा मतदारसंघांमध्ये व्हीव्हीपॅट यंत्रांचा वापर करण्यात आला होता. आता महानगरपालिकांमध्ये हा प्रयोग यशस्वी ठरला. बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने तशा पद्धतीची रचना असलेली यंत्रे तयार करण्यास खर्च वाढणार आहे.