बेस्टच्या वडाळा आगार नृत्य प्रकरणी कारवाई करण्यात आली असून मराठी अभिनेत्री माधवी जुवेकरसहित सात कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. दसऱ्यानिमित्त वडाळा आगारमध्ये आयोजित कार्यक्रमात डान्स करत असताना नोटांची उधळण करण्यात आली होती. यावेळी माधवी जुवेकर तोंडात नोटा धरुन नाचताना दिसत होत्या. कार्यक्रमातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यानंतर अनेकांनी टीका करत कारवाई करण्याची मागणी केली होती.

माधवी जुवेकर बेस्टमध्ये लिपिक पदावर कार्यरत होत्या. चौकशी समितीने कारवाई करत सात जणांना बडतर्फ केलं असून पाच जणांची पदोन्नती रोखण्याची शिफारस करण्यात आली आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकीकडे बेस्टचे कर्मचारी आर्थिक विवंचनेत असून संप करत आहेत, तर दुसरीकडे अशाप्रकारे बेस्ट डेपोमध्येच नोटा उधळल्या जात आहेत याबाबत सर्वसामान्यांनी चीड व्यक्त केली होती. पण व्हिडिओमध्ये उधळलेल्या नोटा या खोट्या असल्याचे माधवीने प्रसारमाध्यमांना सांगितले होते.

दसऱ्याच्या निमित्ताने काही सांस्कृतिक कार्यक्रम वडाळा डेपोत सादर झाले होते. यावेळी गरबा, जोगवा असे विविध नृत्यप्रकार कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सादर केले. याचदरम्यान कच्छी नृत्य करत असतानाचा हा व्हिडिओ आहे. या नृत्यात महिला तोंडात पैसे धरुन कमान करतात, त्याप्रमाणे आपण खोट्या नोटा तोंडात धरुन डान्स केल्याचा दावा माधवी जुवेकर यांनी केला होता.