|| निशांत सरवणकर

वडाळ्यातील गणेश नगर परिसरातील निर्जन स्थळी विजेंद्र नाकते याचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनाही तो अतिमद्यसेवनामुळे मरण पावला असावा, असे वाटत होते. शवचिकित्सा अहवालातही जवळपास तसाच निष्कर्ष काढण्यात आला होता. पण घटनास्थळाची बारकाईने पाहणी केल्यानंतर पोलिसांना धागा मिळाला..

वडाळा पूर्वेतील गणेश नगर परिसरातील निर्जन जागेत एका तरुणाचा मृतदेह आढळला. याच परिसरात राहणाऱ्या विजेंद्र नाकते (२७) याचा मृतदेह असल्याची ओळख पटविण्यात आली. परंतु निर्जन परिसरात तो काय करत होता वा तो येथे कसा आला, या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना मिळत नव्हती. मृतदेहावर मारहाणीच्या खुणा नसल्याने ही खरोखरच हत्या असावी का, याबाबतही पोलीस साशंक होते.

वडाळा पोलिसांनी मृतदेह शवचिकित्सेसाठी केईएम इस्पितळात पाठविला. शवचिकित्सेतही काही आक्षेपार्ह आढळले नाही. मारहाणीच्या वा गळा आवळल्याच्या कुठल्याही खुणा नव्हत्या. विजेंद्र मद्यपान करीत असे. शरीरात काही प्रमाणात विष आढळले होते. ते मद्यामुळे निर्माण झाले असावे, असा पुसटसा निष्कर्ष शवचिकित्सा अहवालात काढण्यात आला होता. अधिक तपास होण्याची आवश्यकता असल्याचे मतही अहवालात नोंदविण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी अपघाती मृत्यू अशी नोंद करून तपास सुरू केला. बंदर विभागाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनीही या प्रकरणात जातीने लक्ष देऊन सखोल तपास करण्याचे आदेश दिले. नक्कीच काहीतरी गडबड आहे असे त्यांना आवर्जून वाटत होते. परंतु हाती काहीच नव्हते.

व्यवसायाने कोळी असलेला विजेंद्रचा असा अचानक झालेला मृत्यू त्याच्या परिचितांना धक्कादायक होता. तो कमालीचा मद्यपान करत होता हे खरे असले तरी त्याचा मृत्यू झाल्याने सारेच संभ्रमात पडले होते. त्याचा मृत्यू पचविणे घरच्यांनाही कठीण झाले होते. परंतु शवचिकित्सा अहवालातही आक्षेपार्ह काहीही न आढळल्याने पोलिसांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी भाऊ  विश्वास याच्याकडे सुपूर्द केला. पोलिसांनी मात्र समांतर तपास सुरू केला होता.

विश्वासकडून पोलिसांनी अधिक माहिती घेतली. त्याच परिसरात राहणाऱ्या काजल पाटील हिच्याशी विजेंद्रचे प्रेमसंबंध होते. दोघे काही वर्षांपासून एकत्र होते. परंतु काजलच्या घरच्या मंडळींना हे प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्यांनी तिचे लग्न साताऱ्यातील एका व्यावसायिकाशी लावून दिले. तरीही विजेंद्र आणि काजल एकमेकांना लपून भेटत होते. नवऱ्याला सोड आणि माझ्याशी लग्न कर, असा तगादा विजेंद्रने लावला होता. मात्र काजलला ते मान्य नव्हते. पोलिसांना तपासाच्या अंधारात उजेडाची किंचित लकेर दिसली आणि त्यांनी या माहितीच्या आधारे तपास पुढे नेला.

मृतदेह सापडला तेव्हा करण्यात आलेला पंचनामा पुन्हा तपासण्यात आला. मृतदेह जेथे सापडला त्या बाजूलाच त्याच्या चपला आढळल्या होत्या. चपला नीट लावून ठेवण्यात आल्या होत्या, असे पंचनाम्यात नमूद होते. तेथेच ही हत्या असल्याचा संशय आल्याचे उपायुक्त डॉ. करंदीकर यांनी सांगितले. एखादा मद्यपी भरपूर मद्यप्राशन करून खाली पडतो, तेव्हा तो अस्ताव्यस्त पडतो. अशा वेळी नीट लावून ठेवलेल्या चपला पाहून या प्रकरणात नक्कीच काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय बळावल्याचे डॉ. करंदीकर यांनी सांगितले.

उपनिरीक्षक सुशील इंगळे यांचे पथक साताऱ्याला गेले. तेथे काजलची चौकशी करण्यात आली. परंतु आपण त्याला ओळखत नसल्याची भूमिका तिने घेतली. पण तिला विश्वसात घेतल्यावर तिने प्रेमसंबंध असल्याचे मान्य केले. तिच्या या वागण्यामुळे संशय अधिकच बळावला.

काजलच्या घरच्या मंडळींचीही पोलिसांनी लगेच चौकशी केली. त्यामध्ये एका लहान मुलीचाही समावेश होता. वटपौर्णिमेच्या दिवशी विजेंद्रला रात्री घरी जेवण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. तो घरी आला. जेवला आणि त्याच्या घरी गेला. पुढे काय झाले माहीत नाही, असा जबाब या सर्वानाच दिली. सर्वाचा जबाब सारखाच होता. त्यात किंचितसाही फरक नव्हता. त्यामुळे नक्कीच काहीतरी गडबड आहे, याची खात्री पटली. काजलला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. अखेर सततच्या चौकशीत तिने विजेंद्रच्या हत्येची कबुली दिली.

लग्नानंतरही विजेंद्रला मी भेटत असे. पण तो सतत सांगत असे की, नवऱ्याला सोड आणि माझ्याशी लग्न कर. आपण पनवेलला घर घेऊ  आणि संसार करू, असा तगादा त्याने लावला होता. तो सारखाच पाठी लागला होता. मला त्रासही देत होता. अखेर मी त्यालाच संपविण्याचे ठरविले. मुंबईतल्या घरी मी त्याला जेवायला बोलाविले. उंदीर मारण्याचे औषध त्याच्या जेवणात टाकले. संशय येऊ  नये म्हणून त्याची मात्रा कमी टाकण्याची खबरदारी घेतली. जेवण झाल्यावर त्याला दारूही प्यायला दिली. अस्वस्थ वाटत असल्याचे सांगून तो मग निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला, अशा शब्दांत तिने आपल्या कृत्याची कबुली दिली.

तूर्तास पोलिसांनी काजलला अटक केली आहे. मात्र तिची हकिगत पोलिसांना पूर्णपणे मान्य नाही. या हत्येत आणखी काही जणांचा सहभाग असावा, असा त्यांचा संशय आहे. वडाळा पोलीस ठाण्याच्या महिला निरीक्षक चारू भारती पुढील तपास करीत आहेत.

विजेंद्रचा घरातच मृत्यू झाला असावा आणि नंतर त्याचा मृतदेह निर्जन ठिकाणी नेऊन टाकण्यात आला असावा. परंतु काजलच्या घरातील प्रत्येकाची जबानी इतकी बेमालूम होती की, ‘दृश्यम’ चित्रपटाचा रिमेक तर अनुभवत नाही ना, असा क्षणभर त्यांना भास झाला.

nishant.sarvankar@expressindia.com  Twitter : @ndsarwankar