वडाळ्यातील अपघातानंतर ‘एमएमआरडीए’वर कारवाईची मागणी

पावसापासून बचाव करण्यासाठी रस्त्याच्या दुभाजकावर थांबलेल्या तीन तरुणांना ट्रेलरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर, अन्य एक जखमी झाला. वडाळा येथील मोनोरेल स्थानकाखालील रस्त्यावर बुधवारी सायंकाळी घडलेल्या या अपघाताला येथील खचलेला रस्ता जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. खचलेल्या रस्त्यामुळेच ट्रेलरचालकाचा वाहनावरील ताबा सुटून तो दुभाजकावर चढला, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे असून याप्रकरणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

शीव प्रतीक्षा नगर येथे राहणारे विनायक ढगे (वय २३), सिद्धेश मसे (वय २५) आणि सिद्धेश चव्हाण (वय २२) हे तीन मित्र बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी वडाळा सीएसटी रोडवरील आयमॅक्स सिनेमा परिसरात आले होते. त्या वेळी अचानक पाऊस सुरू झाल्याने हे तिघेही भक्तिपार्क मोनो रेल स्थानकाखालील दुभाजकावर निवाऱ्यासाठी थांबले होते. त्याच वेळी सीएसटीकडे निघालेल्या भरधाव ट्रेलरने त्यांना धडक दिली. या अपघातात विनायक ढगे आणि सिद्धेश मसे यांचा जागीच मृत्यू झाला तर सिद्धेश चव्हाण याच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडाळा पोलिसांनी याप्रकरणी ट्रेलर चालक कलीम शेख (वय ४५) याला अटक केली आहे.

चालकाचा ट्रेलरवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांचे म्हणणे असले तरी या अपघाताला येथील रस्त्याची दुरवस्था जबाबदार असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. चेंबूर ते वडाळा या मोनो रेल्वेच्या पहिल्या टप्प्यासाठी एमएमआरडीएकडून रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून मोनोचे खांब उभे केले आहेत. त्यामुळे संपूर्ण मोनो मार्गाखालील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या मधला भाग खचून एका बाजूने बाहेर आला आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे दोन्ही बाजूंना असलेली पहिली लेन बंद करण्यात आली आहे. मात्र अनेकदा नवीन वाहनचालकांच्या ही बाब लक्षात येत नसल्याने या ठिकाणी रोज एक तरी अपघात होत असल्याची माहिती स्थानिक रहिवासी  सय्यद सो यांनी दिली आहे.