मुंबई : वाडिया रुग्णालयाच्या कारभारात अनियमितता असल्याचा पालिका आणि राज्य सरकारचा दावा असेल तर त्यासाठी या दोन यंत्रणांच जबाबदार आहेत. किंबहुना, त्यांच्या आशीर्वादाने आणि योग्यवेळी कारवाई न केल्यामुळेच ही अनियमितता आहे, असे ताशेरे उच्च न्यायालयाने मंगळवारी पालिका आणि राज्य सरकारवर ओढले. त्याचवेळी १२ फेब्रुवारीला पालिका आणि राज्य सरकारने वाडिया रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळासोबत बैठक घ्यावी आणि व्यापक जनहित ध्यानी ठेवून निधीबाबतचा वाद मिटवावा वा जबाबदारीतून वेगळे व्हावे, असे आदेशही न्यायालयाने पालिका- राज्य सरकारला दिले.

सरकार आणि पालिकेतर्फे अनुदानापोटी दिला जाणारा  निधी थकवल्यानंतर वाडिया रुग्णालय विश्वस्त मंडळाने रुग्णालय बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हा वाद न्यायालयात पोहोचल्यानंतरसरकार-पालिकेला धारेवर धरत बैठकीद्वारे तोडगा काढण्याचे आदेश दिले होते. त्याचवेळी निधी तातडीने देण्याचेही न्यायालयाने बजावले होते.