संशोधन सादरीकरण, मुलाखतीची कामे रखडल्याचा परिणाम; संशोधन मान्यता समितीच्या बैठकाच होत नसल्याने अडचणी

मुंबई विद्यापीठातील पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण आणि जाहीर मुलाखत, तसेच संशोधन प्रकल्पांचे काम सध्या रखडले आहे. संशोधन मान्यता समितीच्या बैठकाच न झाल्यामुळे संशोधन थंडावले आहे. दोन वर्षे निवड होऊनही विद्यार्थ्यांना पीएच.डी.ला प्रवेश मिळालेला नाही.

राज्यातील प्रतिष्ठित मुंबई विद्यापीठातील कारभाराचे नवनवे नमुने सातत्याने समोर येत असतात. नावाजलेले हे विद्यापीठ संशोधनाबाबत मात्र उदासीन असल्याचे दिसत आहे. विद्यापीठातील अनेक विद्यार्थ्यांनी पीएच.डी.चा प्रबंध सादर करूनही त्यांची तोंडी परीक्षा (व्हायवा) अद्याप झालेली नाही. काही विद्यार्थ्यांना पीएच.डी.ला प्रवेश मिळाला आहे. मात्र, मार्गदर्शकच नेमण्यात न आल्यामुळे विद्यार्थ्यांचे संशोधनाचे काम सुरू झालेले नाही. अनेकांचे पीएच.डी.चे प्रबंध तयार असूनही त्यांना सादर करता आलेले नाहीत. संशोधन प्रकल्पांनाही मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे प्राध्यापकांना निधी मिळालेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून म्हणजेच करोना कालावधीत विद्यापीठातील बाकी कामकाज पूर्वपदावर आले असले तरीही संशोधन प्रकल्प, पीएच.डी. यांबाबत विद्यापीठ  गंभीर नसल्याचे दिसत आहे.

विद्यापीठातले सर्व संशोधन प्रकल्प, पीएच.डी.चे विषय यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संशोधन मान्यता समितीला असतात. मात्र, अनेक विषय समित्यांच्या बैठकाच वर्षभर झालेल्या नाहीत. विद्यापीठ अधिसभा, व्यवस्थापन परिषदेपासून सर्व बैठका ऑनलाइन घेऊन निर्णय घेण्यात येत असताना संशोधन मान्यता समितीच्या बैठका मात्र का घेण्यात येत नाहीत, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

पीएच.डी.चे प्रवेशही नाहीत

विद्यापीठाने पीएच.डी.साठीची प्रवेश परीक्षा (पेट) २०१९ मध्ये घेतली होती. त्यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अद्यापही प्रवेश मिळालेले नाहीत. या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया लवकर न झाल्यास त्यांना पुन्हा प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. काही महाविद्यालयांना संशोधन केंद्र दिले. मात्र, तेथे विद्यार्थ्यांना प्रवेशच देण्यात आलेले नाहीत. याबाबत प्राध्यापक संघटनांनीही विद्यापीठाकडे तक्रारी केल्या आहेत.

‘संशोधनाच्या बाबतीत विद्यापीठ गंभीर नाही. संशोधन मान्यता समित्यांच्या बैठका न झाल्यामुळे प्रवेश आणि संशोधन प्रकल्प रखडले आहेत. याबाबत विद्यापीठाकडे तक्रार करूनही विद्यापीठाने त्याची दखल घेतलेली नाही.’

डॉ. वैभव नरवडे, मुंबई युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन

संशोधन मान्यता समित्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. आता रचनेतही काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे एकच समिती पीएच.डीच्या प्रवेशापासून पुढील सर्व निर्णय घेईल. विषय मान्यता, प्रगती अहवाल, पीएचडी देणे अशा प्रत्येक टप्प्यासाठी वेगळ्या समित्या होत्या. ही सर्व कामे आता एकच समिती करेल, त्यामुळे वेळही वाचेल.

– डॉ. रविंद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू, मुंबई विद्यापीठ