देशभरातील विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आणि गेल्या काही वर्षांपासून फरार असलेल्या  वकास या इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्याची अटक हे तपास यंत्रणांचे मोठे यश आहे. लवकरच या साखळीतील आणखी दोन दहशतवाद्यांनाही अटक होईल आणि त्यांच्या चकशीतून महत्त्वपूर्ण माहिती उघड होईल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी रविवारी येथे केला.
 इंडियन मुजाहिदीनच्या चार अतिरेक्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने केलेल्या अटकेसंदर्भात पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी हा दावा केला. वकास हा पाकिस्तानी असून मुंबईसह देशभरात झालेल्या विविध दहशतावदी हल्ल्यांचा त्याचा सहभाग होता. गेल्या आठ- दहा दिवसांपासून तपास यंत्रणा त्याच्या मागावर होत्या. त्यामुळे वकासची अटक ही मोठी उपलब्धी असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच  याच गटाशी संबंधित आणखी दोन अतिरेक्यांच्या मागावर तपास यंत्रणा असून त्यांनाही लवकरच अटक होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत पूर्ण काळजी घेण्यात आली असून त्यांच्या जीवितास कसलाही धोका नसल्याचेही शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
 मोदी यांच्या सुरक्षेबाबत भाजपच्या शिष्टमंडळाने आपली भेट घेतली तेव्हाच मोदींना कसलाही धोका नसल्याचे आपण त्यांना सांगितले. पटना येथे मोंदीच्या सभेत झालेल्या स्फोटांनंतर आपण स्वत: त्यांच सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली असून देशातील सर्वच नेत्यांची सुरक्षा व्यवस्था मजबूत असल्याचेही त्यांनी सांगितले.