घाटकोपर

घाटकोपर रेल्वे स्थानक. अनेक जण घाटकोपरमध्ये कपडे व अन्य वस्तूंची खरेदी करण्यासाठी हमखास येत असतात. घाटकोपरमध्ये त्यामुळे कपडे, खाऊची दुकाने आदींची गर्दी अधिकच. स्थानकाच्या पूर्वेकडून किंवा पश्चिमेकडून बाहेर पडा सगळीकडेच विविध वस्तूंच्या विक्रीसाठीची मोठी दालने दृष्टीस पडतात. तर पश्चिमेकडे असलेल्या मोठ-मोठय़ा खासगी कंपन्यांच्या कार्यालयांमुळे या परिसराला एक ‘कॉर्पोरेट’ लूकआला आहे. याच पश्चिमेला स्थानकाच्या अगदीच बाहेर रामनारायण झुनझुनवाला महाविद्यालयामुळे तरुणाईचा निखळ झरा येथे कायम वाहत असतो. तसेच स्थानकावरील घाटकोपर मेट्रो स्थानकामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने या प्रवाशांना स्थानक परिसरात भूकलाडू पुरविण्यासाठी खाऊची चांगली दुकानेही सुरू झाली आहेत.

घाटकोपर पूर्वेला असलेले ‘निलयोग स्क्वेअर’ हा मॉल आणि पश्चिमेला असलेले ‘भारत कॅफे’ ही दोन ठिकाणे ही घाटकोपर स्थानक परिसराची खरी ओळख असून येथे आबालवृद्धांपासून तरुणांची झुंबड उडालेली असते. तसेच पश्चिमेकडील श्रेयस सिनेमा या जुन्या वास्तूनेदेखील घाटकोपरच्या ओळखीत भर घातली आहे. याहीपलीकडे जाऊन घाटकोपर पूर्वेला हॉटेल सम्राट तर पश्चिमेला आनंद रेस्टॉरंट, न्यू वेलकम हॉटेल आधी खाण्याचे उत्तम पर्याय आहेत. त्याचबरोबरीने एच. जे. दोशी हिंदूसभा हॉस्पिटल हे पश्चिमेकडील जुन्या घाटकोपरवासीयांसाठी हक्काचे ठिकाण आहे. रुग्णालयापासून ते खाद्यकेंद्रापर्यंत व महाविद्यालयांपासून मॉलपर्यंत सगळ्याच केंद्रांनी गजबजलेले आहे.

निलयोग स्क्वेअवर

निलयोग स्क्वेअर हा मॉलदेखील पूर्वेला स्थानकाबाहेर आहे. चार मजली या मॉलमध्ये सध्याच्या आघाडीच्या उत्पादनांची आकर्षक दालने असून तरुणाईला आकृष्ट करणारे आयनॉक्स हे सिनेमाघर या मॉलची निश्चितच शोभा वाढवते.

महाविद्यालयांमुळे तरुणाईचा राबता

रामनारायण झुनझुनवाला महाविद्यालय व एस. पी. एन. दोशी महिला महाविद्यालयांमुळे पश्चिम भागात तरुणाईची लक्षणीय उपस्थिती असते.दहावीनंतर या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अनेकांच्या उडय़ा पडत असून अन्य उपनगरांतील बहुतांश विद्यार्थी या महाविद्यालयांना आपली पसंती देतात. मात्र हल्ली या झुनझुनवाला महाविद्यालयाबाहेर चायनीजच्या नावाखाली अनधिकृतरीत्या सुरू झालेले चायनीज, मंच्युरिअनची विक्री केंद्रे सुरू झाली असून येथील निकृष्ट  दर्जाच्या खाद्यपदार्थानादेखील तरुण अवाजवी महत्त्व देताना दिसतात.

भारत कॅफे

भारत कॅफे हे घाटकोपर पश्चिमेकडील दक्षिण भारतीय व्यंजनांचे चवदार केंद्र असून येथील चीझ पुलाव, पावभाजीवर खवय्यांच्या उडय़ा पडतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असून अनेक हॉटेल्स व आइस्क्रीम पार्लरमधून गायब झालेले ‘सॉफ्टी आइस्क्रीम’ येथे आवर्जून मिळते. आंबा व चॉकलेटचे थंडगार फ्यूजन हे येथील सॉफ्टीचे वैशिष्टय़ आहे.

अग्रवालची ‘पाणीपुरी’

घाटकोपर पश्चिम भागातच मुंबई दिशेला व स्कायवॉकच्या खाली असलेले जुने अग्रवाल ज्युस सेंटर व भेलपुरी येथील पाणीपुरीची चव अनेकांना भुरळ घालते. या पाणीपुरीसाठी अनेकांच्या उडय़ा पडत असून येथील अन्य शेवपुरी व स्पेशल ओली भेळ हे चाट पदार्थही लोकप्रिय आहेत.