चहाची भुकटी, लाकडाच्या भुशापासून रासायनिक पाण्याचे शुद्धिकरण, वृद्धांच्या मार्गातील अडथळ्यांची सूचना देणारी ‘वांगडू’ व्हीलचेअर, तलावातील अनावश्यक वनस्पती उखडणारी बोट, हवेच्या दाबावर चालणारी वाहने आदी विद्यार्थ्यांच्या अफलातून व भन्नाट कल्पनांमधून साकारलेले विज्ञान प्रकल्प पाहण्याची संधी मुंबईकरांना १५ डिसेंबपर्यंत मिळणार आहे.
२५ व्या ‘पश्चिम भारत विज्ञान जत्रे’च्या निमित्ताने वरळीच्या ‘नेहरू विज्ञान केंद्रा’त हा विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जागरात सुरू झाला असून बुधवारी ‘व्हीजेटीआय’चे संचालक डॉ. ओ. जी. काकडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या अचाट कल्पना आणि हुशारीचा संगम या प्रकल्पांच्या मांडणीत दिसून येतो. विज्ञान प्रकल्पांबरोबरच हृदयाचे कार्य, लंबवृत्त, प्रकाशाचे परावर्तन, हवेचा दाब आदी विज्ञान, गणितातील समजण्यास कठीण असलेल्या संकल्पना मॉडेल्सच्या मांडणीतून सोप्या करून कशा शिकविता येतील, याची माहिती देणारी शिक्षकांनी तयार केलेली साधनेही या ठिकाणी पाहता येतील. विज्ञान, पर्यावरण, तंत्रज्ञान या विषयी कुतूहल असलेल्या विद्यार्थी, शिक्षकांनी तर या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यायला हवी.
भूकंपरोधक इमारत कशी असावी, रस्त्यावर वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर (रेन वॉटर हार्वेस्टींग) कसा करावा, सौर उर्जेवर पाण्याचे शुद्धिकरण आणि वीजनिर्मिती कशी करता येईल, जेट्रोफा, पोल्ट्रीबीट्स, मानवी विष्ठेपासून स्वस्तात बायोगॅस कसा तयार करता येईल, सांडपाण्यापासून वीजनिर्मिती आणि पाण्याचे शुद्धिकरण करणारे सयंत्र आदी विद्यार्थ्यांनी तयार केलेले ३९ प्रकल्प या प्रदर्शनात पाहता येतील. यापैकी काही प्रकल्प चलित (वर्किंग) आहेत.
‘भविष्यात उद्भवणारा पर्यावरणाचा, वीज, पाणी, इंधन आदी नैसर्गिक संसाधनांच्या तुटवडय़ाचा, नैसर्गिक आपत्तींचा विचार करून हे प्रकल्प तयार केले गेले आहेत. विद्यार्थ्यांची कल्पकता, हुशारी यांचा कस या प्रकल्पांमध्ये लागतो. मुलांमध्ये विज्ञानाविषयी कुतुहल निर्माण करण्याच्या उद्देशाने भरविण्यात येणाऱ्या या प्रदर्शनातील प्रकल्पांचा दर्जाही दरवर्षी उंचावत चालला आहे,’ असे या प्रदर्शनाचे समन्वयक ए. व्ही. जेठे यांनी सांगितले.
रासायिक पाण्याचे शुद्धीकरण
टाकाऊ वस्तूतून रासायनिक पाणी शुध्द करण्याचे अफलातून तंत्र चिपळूणच्या खेरडी येथील ‘न्यू इंग्लिश स्कूल’च्या विद्यार्थिनींनी तयार केले आहे. नारळाची केसरे, उसाची चिपाडे, केळाच्या साली, लाकडाचा भुसा, गव्हाचा कोंडा, चहाची वापरलेली भुटकी, कांद्याच्या साली यांमध्ये पीबीटूप्लस, टूएनटूटी आदी कारखान्यातून सोडली जाणारी घातक रासायनिक द्रव्ये शोषून घेण्याची क्षमता आहे. ही रासायनिक द्रव्ये शोषून घेऊन रासायनिक पाणी शुद्ध करणारा पाईप प्रतीक्षा धायगुडे आणि गौरवी गवस या मुलींनी तयार केला आहे. ही शोषून घेतलेली रासायनिक द्रव्ये साध्याशा प्रक्रियेनंतर परत मिळविता येतात. म्हणजे पाणी आणि रासायनिक द्रव्यांचा पुनर्वापर या मुलींनी शक्य करून दाखविला आहे. हे तंत्र विकसित करणारी प्रतीक्षा स्वत: चिपळूणच्या एमआयडीसी परिसरात राहते.
 ‘रासायनिक द्रव्यांचे घातक परिणाम आम्ही दररोज अनुभवत असतो. या अनुभवातूनच हे तंत्र विकसित करण्याची प्रेरणा मिळाली,’ असे दहावीत शिकणारी प्रतीक्षा सांगते. या प्रकल्पाने राज्यस्तरावरील स्पर्धेत प्रथम पारितोषिक पटकावले होते.
वांगडू व्हीलचेअर
वृद्धांना आणि विकलांग व्यक्तींच्या अडचणी लक्षात घेऊन नाशिकच्या ‘फ्रावशी स्कूल’च्या ॠषभ मिश्रा याने ‘वांगडू’ नावाची भन्नाट व्हीलचेअर तयार केली आहे. ‘थ्री इडियट्स’मधील ‘वांगडू’ नामक पात्रापासून प्रेरणा घेऊन त्याने या व्हीलचेअरचे नामकरण केले आहे. साध्या प्लॅस्टीकच्या खुर्चीच्या पायांना चाके जोडून त्याने ही व्हीलचेअर तयार केली असली तरी त्याची गंमत त्याला जोडलेल्या संगणकावरील कळफलक दाबल्यानंतर लक्षात येते. कळफलकांच्या आधारे ही व्हीलचेअर पुढे-मागे जाते. व्हीलचेअरच्या मार्गात अडसर येत असल्यास आवाजाद्वारे त्याची सूचना देणारे सेन्सॉर हे या व्हीलचेअरचे वैशिष्टय़ म्हणता येईल.
महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगढ, दादरा आणि नगर हवेली, गोवा, दीव-दमण या राज्यांतून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रदर्शनांची मांडणी केली आहे. १५ डिसेंबरला होणाऱ्या कार्यक्रमात हाफकिनचे संचालक डॉ. अभय चौधरी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीसे दिली जातील.  प्रदर्शनात सहभागी होणाऱ्यांना या प्रकल्पांबरोबरच केंद्रातील आकाश निरीक्षण, गॅलरी भेट, सायन्स ओडिसी, थ्रीडी सायन्स शो आदींनाही भेट देता येईल.       

दहशतवाद्यांना टिपून मारणारा रोबो
रायगडच्या ‘राजाराम मोने ज्युनिअर कॉलेज’च्या राजेंद्र चव्हाण या बारावीच्या विद्यार्थ्यांने तयार केणारा स्वयंचलित रोबो हा या प्रदर्शनातील आणखी एक लक्षवेधी प्रकल्प. रायफल आणि चार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने हा रोबो दहशतवाद्यांना अक्षरश: ‘टिपून’ मारतो. एखाद्या इमारतीत दहशतवादी लपून बसले असल्यास त्यांच्याकडील शस्त्रास्त्रांच्या धातूंचा नमुना या ‘रोबो’त फीड केला म्हणजे काम फत्ते. दहशतवाद्याकडून होणाऱ्या गोळीबारावरून त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे शस्त्र आहे ते बरोबर ओळखता येते. रोबोमधील सेन्सॉर या माहितीच्या आधारे १ किलोमीटर परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधून काढतो आणि त्याची माहिती ‘रोबो’ चालविणाऱ्या सैनिकाला पुरवितो. या माहितीच्या आधारे पुढचे ‘ऑपरेशन’ पूर्ण करणे सैनिकांना सहज सोपे जाते. हा रोबो तयार करायला राजेंद्रला १४ हजार रुपये खर्च आला. तो त्याने स्वत:च्या खिशातून केला. त्याच्या प्रकल्पाने पहिला क्रमांक पटकावला. पण, केवळ प्रकल्प खर्चिक असल्यानेच अवघ्या दोन गुणांनी त्याला राज्यस्तरीय चॅम्पियनशीप गमवावी लागली..