राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या राजकीय संघर्षांचे तीव्र पडसाद सोमवारी विधानसभेत उमटले.
मुंब्य्रात मोठय़ा प्रमाणात पाणीचोरी व अनधिकृत बांधकामे सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सरनाईक यांनी केली. त्यावर गरिबांना एक आणि श्रीमंताना एक न्याय कसा लावता, असा सवाल करीत पाणी चोरी करणाऱ्या मोठय़ा लोकांची नावेही जाहीर करा, अशी मागणी करून आव्हाड यांनी सरनाईक यांना प्रत्युतर दिले. त्यावरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
मुंब्रा आणि दिवा भागाला शहरातील अन्य भागापेक्षा ठाणे महापालिका कमी पाणी देत असल्याचा मुद्दा जितेंद्र आव्हाड यांनी मांडला. या विभागात तीव्र पाणीटंचाई असून मुंब्य्रासाठी आणखी ५ दशलक्ष लिटर्स पाणी देण्याची मागणी आव्हाड यांनी केली. त्यावर शहराच्या तुलनेत मुंब्रा विभागात कमी पाणी मिळत असल्याची कबुली नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दिली. त्याचवेळी त्यांनी शहरात पाणीपट्टीची ९० वसुली असताना मुंब्रा विभागात मात्र हेच प्रमाण ३७ टक्के असून शहरातील १५ हजार पैकी ५ हजार अनाधिकृत नळजोडण्या याच विभागात असल्याचेही जाधव यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.
 मंत्र्यांकडून अपेक्षित उत्तर मिळत नसल्याने नाराज झालेल्या आव्हाड यांनी राज्यमंत्र्यांना धारेवर धरले होते. त्याचवेळी प्रताप सरनाईक यांनीही चच्रेत सहभागी होत मुंब्य्रात पाणी बिलाची ३७ टक्के आणि मालमत्ता कराची २९ टक्के वसुली होते. त्यामुळे मुंब्य्रासाठी ठाण्यातील अन्य भागावर अन्याय करू नये. ठाण्याच्या अन्य भागातही पाणी टंचाई आहे. सरकार आणि महापालिकेने आधी मुंब्य्रातील अवैध नळ जोडण्या आणि अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली. तसेच पाणी बिले वसुलीला जाणाऱ्या अधिकाऱ्यांवर स्थानिकांकडून हल्ले होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या आव्हाड यांनी थेट सरनाईक यांना आव्हान दिले.
मुंब्य्रात कधीही पाणीपट्टी वसुलीसाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांवर हल्ले झाले नाहीत. जर गरीबांचे पाणी आणि बांधकामे तोडण्याची भाषा होत असेल तर पाणीचोरी करणाऱ्या व अनधिकृत बांधकामे करणाऱ्या ठाण्यातील बडय़ा लोकांची नावेही जाहीर करा, अशी मागणी आव्हाड यांनी केली. एवढेच नव्हे तर पाणीचोरी आणि अनाधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा आणि तक्रारी दाखल झाल्या असतानाही कारवाई का झाली नाही. गरीबांना एक न्याय व श्रीमंतांना एक न्याय का? असा सवाल करीत आव्हाड यांनी सरनाईक यांना प्रत्युत्तर दिले. सभागृहात दोन्ही आमदारांमध्ये सुरू झालेल्या या आव्हान-प्रतिआव्हानाच्या भाषेने सारे सभागृह आवाक् झाले.
 त्यावर सभागृहाचा उपयोग समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी व जनहितासाठी केला जातो. व्यक्तिगत विषय मांडण्याची ही जागा नव्हे. त्यासाठी सदनाचा वापर करू नका, असे खडे बोल राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी सुनावले व या वादावर पडदा टाकला. तसेच मुब्य्राला येत्या दोन महिन्यात ५ दशलक्ष लिटर्स पाणी देण्याचे आश्वासनही जाधव यांनी यावेळी दिले.