मुंबईचे छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी देणाऱ्या इसमास २४ तासांच्या आत गुन्हे शाखेने अटक केली. सोमवारी या आरोपीने निनावी दूरध्वनी करून विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. व्यवसायातील भागीदाराच्या विमान प्रवास अडथळा निर्माण व्हावा यासाठी त्याने बॉम्ब ठेवल्याचा बनाव रचला होता.
याबाबत माहिती देताना गुन्हे शाखा युनिट ८ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी सांगितले की, सोमवारी संध्याकाळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बी टर्मिनसच्या हेल्प डेस्कवर एक निनावी दूरध्वनी आला होता. सोमवारी रात्री ७ ते १० या काळात विमानतळ बॉम्बने उडविले जाणार आहे, असे त्या इसमाने सांगितले होते. त्यामुळे विमानांची उड्डाणे थांबवून संपूर्ण विमानतळाची कसून तपासणी करण्यात आली होती.
 याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी ४ वाजता विलेपार्ले येथे सापळा लावून कुबेर हुसेन (३८) याला अटक केली. हुसेन याची ठाण्यात कुमार इंटरनॅशनल मॅन पॉवर कन्सल्टंट ही कंपनी असून परदेशात नोकरीसाठी माणसे पाठविण्याचा त्याचा व्यवसाय आहे. त्याचा सबएजंट वसीम हा कुबेर याचे पैसे बुडवून गुवाहाटीला सोमवारी रात्री जाणार होता. त्याच्या प्रवासात अडथळा निर्माण होऊन त्याला धडा शिकवण्यासाठी त्याने हा दूरध्वनी केल्याचे फटांगरे यांनी सांगितले