महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधातील उत्तर भारतीयांविरोधात चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दलचे वॉरंट बुधवारी वांद्रे येथील न्यायालयाकडून रद्द करण्यात आले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी २००८ साली रेल्वेभरती प्रकरणी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती. याप्रकरणी मनसेच्या कार्यर्त्यांना चिथावणी दिल्याचा आरोप राज ठाकरेंवर आहे. दहा जून रोजी राज ठाकरेंविरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते. त्यावेळी राज ठाकरे वांद्रे न्यायालयासमोर उपस्थित राहू शकले नाहीत. त्यानंतर बुधवारी त्यांनी न्यायालयासमोर हजेरी लावली. यावर न्यायालयाने राज ठाकरेंविरोधातील वॉरंट रद्द केले. न्यायालयात राज ठाकरेंची बाजू मांडत त्यांच्या वकिलाने मारहाणीची घटना घडली, तेव्हा राज ठाकरे तेथे उपस्थित नव्हते आणि झालेल्या तोडफोडीमागे त्यांचा कोणताही सहभाग नसल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने राज ठाकरेंना पुढील सुनावणीसाठी एक जुलै रोजी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.