मुंबई पोलिसांनी टीआरपी घोटाळा उघड केला असून तपासाला सुरुवात झाली आहे. यादरम्यान एका साक्षीदाराने एनडीटीव्हीशी बोलताना काही ठराविक चॅनेल पाहण्यासाठी आपल्याला दर महिन्याला पैसे मिळत होते असा खुलासा केला आहे. या व्यक्तीच्या घऱात टीआरपी मोजण्यासाठी मीटर बसवण्यात आलं होतं. तीन साक्षादारांपैकी एक असणाऱ्या या व्यक्तीने आपल्या घरात मीटर लावण्यात आल्यानंतर बिलाची काळजी घेतली जाईल, याशिवाय डीटीएचचा रिचार्जही केला जाईल असं सांगितलं असल्याचा खुलासा केला आहे.

“बॅरोमिटरच्या एका अधिकाऱ्याने मला बॉक्स सिनेमा पाहण्यास सांगितलं होतं. रोज दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत चॅनेल पाहण्यासाठी मला सांगण्यात आलं होतं. यासाठी ५०० रुपये मिळतील असं त्याने म्हटलं होतं,” अशी माहिती साक्षीदाराने दिली आहे. “आपण दोन ते तीन वर्ष हे काम करत होतो, पण हा टीआरपी घोटाळा असेल याची अजिबात कल्पना नव्हती,” असं त्याने म्हटलं आहे.

आणखी वाचा- TRP घोटाळा : ‘रिपब्लिक’ की ‘इंडिया टुडे’; FIR मध्ये नक्की कोणाचं नाव?, पोलीस म्हणतात…

गावी जावं लागल्यानंतर त्याने चॅनेल पाहणं थांबवलं होतं. “मी दूर होतो आणि टीव्ही बंद होता. मी त्यांना सध्या अजिबात टीव्ही पाहत नसल्याचं सांगितलं,” अशी माहिती त्याने दिली आहे. पोलिसांनी टीआरपी घोटाळा प्रकरणी चार जणांना अटक केली असून यामध्ये ‘बॉक्स चॅनेल’ आणि ‘फक्त मराठी’च्या मालकांचा समावेश आहे. न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली आहे.

घोटाळा कसा?
बीएआरसीने केबल किंवा डिशद्वारे वाहिन्यांचे प्रक्षेपण विकत घेणाऱ्या तीन हजार ग्राहकांच्या घरी टीआरपी मोजण्यासाठी गुप्तपणे यंत्रणा बसविली. बीएआरसीने या कामासाठी हंसा रिसर्च ग्रुपची निवड केली. त्यातील अधिकाऱ्यांनी यांतील दोन हजार ग्राहकांना विश्वासात घेतले. महिन्याकाठी किरकोळ रक्कम देण्याच्या आमिषावर ग्राहकांना दिवसभर किंवा दिवसातील काही ठरावीक तास ठरावीक वाहिन्या सुरू ठेवण्यासाठी तयार केले. या कृतीमुळे मिळालेल्या नोंदींआधारे अपेक्षित असलेल्या ठरावीक वाहिन्यांचे टीआरपी वाढवण्यात आले.

आणखी वाचा- समजून घ्या : TRP म्हणजे काय आणि तो कसा मोजतात?

टीआरपी नोंदविणाऱ्या हंसा रिसर्च ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी ग्राहकांना विश्वासात घेऊन खोटय़ा नोंदी तयार करून हा गैरप्रकार केला. या घोटाळ्याचा सुगावा हंसा रिसर्च ग्रुपला जून महिन्यात लागला. त्यानंतर ग्रुपने यातील आरोपी भंडारी याला कामावरून कमी केले होते. हंसा ग्रुपने केलेल्या तक्रोरीवरून गुन्हा नोंदवण्यात आला. अटक आरोपी भंडारी, मेस्त्री यांच्या चौकशीतून रिपब्लिकसह अन्य वाहिन्यांचा टीआरपी कृत्रिमरीत्या वाढविण्यात आल्याची माहिती पुढे आल्याचा दावा पोलीस आयुक्त सिंग यांनी केला. लोकसत्ताला मिळालेल्या माहितीनुसार विशेष पथकाने रिपब्लिक वृत्त वाहिनीच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले आहे. या घोटाळ्यात कंपनीच्या मालकापासून तळाच्या अधिकाऱ्यापर्यंत ज्या कोणाचा सहभाग आढळेल त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असे सिंग यांनी सांगितले.