News Flash

धोबीघाटावरील ‘धोपटणे’ बंद!

कपडे धुणे, सुकविण्यासाठी आता यंत्राचा वापर

कपडे धुणे, सुकविण्यासाठी आता यंत्राचा वापर; महालक्ष्मीतील ७६४, तर कुलाब्यातील १५० प्राचीन दगड शोभेपुरते

मुंबई शहराची ओळख असलेल्या पण आता अस्तंगत होत जाणाऱ्या  अनेक गोष्टींमध्ये पुरातत्त्व विभागाने खास दर्जा बहाल केलेल्या धोबीघाटाचाही समावेश झाला आहे.  कपडे धुण्यातील एकच लय, त्याचा दूरवपर्यंत पोहोचणारा आवाज आणि एकूणच धुलाई वातावरण मुंबईवरील साहित्य आणि चित्रपटांमधून अजरामर असलेले धोबीघाटाचे अस्तित्व कालौघात संपत चालले आहे. धोबीघाटावर विशिष्ट दगडावर कपडे धोपटून धुण्याची पारंपरिक पद्धत कधीच हद्दपार झाली असून त्याची जागा कपडे धुण्याच्या व सुकविण्याच्या नव्या मोठय़ा यंत्रांनी घेतली आहे. धोबीघाट आता कात टाकतोय. हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच मूळ धोबी शिल्लक असून त्यापैकी काही छोटे धोबी पारंपरिक पद्धत वापरत असले तरी त्यांची संख्या नगण्य आहे.

तब्बल १३० वर्षांपूर्वी प्रामुख्याने १८९०-९५ मध्ये पारसी आणि ब्रिटिशांचे कपडे धुण्यासाठी हा धोबीघाट सुरू केला गेला. त्या वेळी विशिष्ट दगड असलेल्या ७६४ कुप्या उभारण्यात आल्या. रात्रभर कपडे कॉस्टिक सोडय़ात भिजत घालून सकाळी पाच वाजता कपडे धुण्यास सुरुवात होत असे. या विशिष्ट दगडावर कपडे धोपटले जात असल्यामुळे पाणीही कमी लागत असे. धोबीघाटाला १४ द्वारे होती. ही सर्व द्वारे सकाळी साडेचार-पाच वाजता उघडली जायची आणि कामगारांना आत सोडले जायचे. सायंकाळी पाचच्या ठोक्यावर त्यापैकी फक्त द्वार क्रमांक तीन वगळता सर्व द्वारे बंद केली जात असत. सध्या या सर्व द्वारांची दुरवस्था झाली आहे. आता कोणीही येतो आणि जातो, अशी स्थिती आहे.  या धोबीघाटात फेरफटका मारला असता  ओसाड पडलेल्या कुप्या आणि प्राचीन दगड यांचे दर्शन प्रामुख्याने होते. याला वेढा पडलाय एकाच वेळी किमान ५० ते कमाल ५०० कपडे धुण्याची क्षमता असलेल्या वेगवेगळ्या अवाढव्य यंत्रांचा आणि तेवढय़ाच आकारमानाचे कपडे सुकविण्याच्या यंत्रांचा. विशिष्ट पद्धतीने बांबू बांधून कपडे सुकविण्याची पारंपरिक पद्धत आता लोप पावत आहे. धोबीघाट परिसरात काही प्रमाणात कपडे सुकताना दिसतात; परंतु ते प्रमाण पूर्वीच्या मानाने खूपच कमी झाल्याचे येथील व्यवसाय सांभाळणारे धोबी लोकेश कनोजिया सांगतात. धोबी कल्याण आणि औद्योगिक सहकारी संस्थेमार्फत या धोबीघाटाची व्यवस्था पाहिली जात होती; परंतु आज या संस्थेवर प्रशासक नेमण्यात आला आहे. या धोबीघाटाच्या शेजारी बडय़ा विकासकांकडून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविली जात आहे. धोबीघाटाला धक्का न लावता योजना राबविली जात असल्याचा दावा केला जात आहे.

झालेले बदल

  • महालक्ष्मी येथील धोबीघाटात ७६४, तर कुलाबा येथील छोटा धोबीघाटात १५० प्राचीन दगड आता शोभेपुरते
  • पाच ते सहा हजार जणांचा उदरनिर्वाह अवलंबून
  • आता एका वेळी किमान ५० ते कमाल ५०० कपडे धुण्याची आणि सुकविण्याची यंत्रे शाबूत.
  • प्रत्येक ‘दगड’धारकाला पालिकेकडून कितीही पाणी वापरले तरी प्रतिमहिना ३०० रुपये आकारले जातात.

वैभव ओसरले..

मुंबईत महालक्ष्मी आणि कुलाबा येथे धोबीघाट आहे. महालक्ष्मी येथील धोबीघाट हा तर परदेशी पर्यटकांचे आकर्षण असतो. महालक्ष्मी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला पुलावरून सातरस्त्याकडे जात असताना डावीकडे हा धोबीघाट हमखास दिसतो. बाबूराव जगताप मार्गापर्यंत सुमारे २३ एकर इतक्या भूखंडावर पसरलेला धोबीघाट अभिनेता अमिताभ बच्चन याच्या ‘डॉन’ चित्रपटातील चित्रीकरणामुळे चांगलाच गाजला होता. २०११ मध्ये ‘धोबी घाट’ या  नावाचा चित्रपटही येऊन गेला. स्वरूपावरून जागतिक मान्यता मिळाली, तरी आता मात्र धोबीघाटाचे पारंपरिक स्वरूप बदलत आहे.  धोबीघाटाच्या आसपासच्या परिसराला झोपडय़ांनी वेढले  होते. आता थेट धोबीघाटातही झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. प्राचीन दगड सुस्थितीत असले तरी पाणी वाहून नेणारी गटारे, आतील मार्गिका तुटल्या आहेत. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कपडे धुण्याच्या आणि सुकविण्याच्या मोठय़ा यंत्रांमुळे ‘तो’ पूर्वीचा प्रसिद्ध धोबीघाट आहे कुठे, असा प्रश्न विचारावा लागतो.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2016 12:38 am

Web Title: washing machine use for laundry business in dhobi ghat
Next Stories
1 ‘आरटीओ’मध्ये जुन्या नोटा स्वीकारणार
2 आश्रमशाळांमधील विद्यार्थी तीन महिने अनवाणी
3 यंत्रणेवर विश्वास नसेल तर व्यवस्था मोडून काढा, उद्धव ठाकरेंचा जेटलींना टोला
Just Now!
X