मुंबईमधील कचराभूमीमध्ये अधूनमधून लागणाऱ्या आगींवर तोडगा म्हणून पालिकेने कचऱ्यावर डेब्रिज टाकण्याचा निर्णय घेतला आहे. इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणचे डेब्रिज कचराभूमीमध्ये टाकण्यात येणार असल्याचे प्रशासनाने बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. मात्र, बिल्डरांचे हित साधण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची टीका काँग्रेसकडून करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी देवनार कचराभूमीतील कचऱ्याने पेट घेतला आणि त्याचा धूर दक्षिण मुंबई ते नवी मुंबईत पसरला होता. या धुरामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. कचराभूमी परिसरातील नागरिकांना नेहमीच दरुगधीचा त्रास होतो. यामुळे कचराभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. कचराभूमीबाबत उपाययोजनांसंदर्भात आयुक्त अजय मेहता यांनी बुधवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत निवेदन केले.