कचऱ्याची शास्त्रोक्त माहिती देणारे दालन
दररोज मुंबईतून लाखो टन कचरा देवनार, मुलुंड, कांजूरमार्गच्या कचरा डेपोत निरुपयोगी म्हणून टाकला जातो. मात्र टाकाऊ मानल्या जाणाऱ्या कचऱ्याची किमया मोठी असून ‘कचरा म्हणजे साधनसंपत्ती’ मानून मुंबईमध्ये कचराची माहिती देणारे दालन सुरू झाले आहे. गेली अनेक वर्षे कचरा व्यवस्थापन, कचरा वेचणाऱ्या महिलांचे प्रश्न यासाठी काम करणाऱ्या ‘स्त्रीमुक्ती संघटने’ने पुढाकार घेऊन ‘क’ कचऱ्याचा तसेच ‘क’ कलाविष्काराचा हे चित्रकला, ग्राफिक्स व माहिती सांगणाऱ्या भित्तीचित्राच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
स्त्रीमुक्ती संघटना गेली अनेक वर्षे कचरा वेचणाऱ्या महिलांच्या अधिकारासाठी लढा देत असून कचरा वेचणाऱ्या महिलांची सद्य:स्थिती सांगणारी प्रतीकात्मक कलाकृती पाठीवर कचऱ्याचा भार उचलणाऱ्या महिलेच्या चित्राच्या साहाय्याने आभा भागवत यांनी साकारली आहे. सुका, ओला आणि घातक कचऱ्याचे वर्गीकरण करीत या प्रकारातील कचऱ्यातून उपयुक्त वस्तूंची निर्मिती केली जाऊ शकते, त्यामुळे कचरा हा फेकून देण्याची बाब नसून कल्पकतेच्या साहाय्याने त्यातून समाजासाठी उपयुक्त असल्याचे केदार प्रभावळकर यांनी सांगितले. गेले अनेक महिने हे माहितीपर दालन साकारण्यासाठी त्यांनी संघटनेला सहकार्य केले आहे. कचऱ्यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होतो, कचऱ्याचे नमुने, कचऱ्याची माहिती सांगणारे भित्तीचित्र आदी बाबींचा समावेश या दालनात करण्यात आला आहे.
देवनार कचरा डेपोचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वसामान्य माणसांनी पुढाकार घेण्याची गरज असून घरामधील कचऱ्याचे वर्गीकरण, कंपोस्टिंग किंवा बायोगॅस निर्मिती सोसाटय़ांमध्येच झाली तर हा कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सुटू शकतो. याची माहिती सर्वसामान्यांना मिळावी आणि त्याचा अवलंब केला जावा अशी इच्छा संघटनेने व्यक्त केली आहे. शालेय शिक्षणात पर्यावरण विषयामध्ये मुलांना कचऱ्याबद्दलची विस्तृत माहिती दिली जात नाही. कचरा म्हणजे घाण अशी समज झाल्यामुळे कचऱ्यातून उपयुक्त निर्मिती होऊ शकते हा विचारच बाजूला पडला आहे. मात्र या कलादालनात कचरा व्यवस्थापनाच्या माहितीमुळे लोकांचा कचऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल असा विश्वास ‘स्त्रीमुक्ती संघटने’च्या ज्योती म्हापसेकर यांनी व्यक्त केला.
हे माहिती दालन कोपरखैरणे येथे स्त्रीमुक्ती संघटनेच्या कार्यालयात सुरू झाले आहे. शुक्रवारपासून हे माहिती दालन सुरू करण्यात आले असून उद्घाटनप्रसंगी व्ही. राधा उपस्थित होत्या.