‘एमआरटीपी’नुसार तीन महिन्यांची शिक्षा, दहा हजार रुपयांचा दंड

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विविध कायद्यांनुसार बांधील असूनही कचरा व्यवस्थापन न करणाऱ्या मोठय़ा गृहनिर्माण संस्था तसेच २००७ नंतर बांधण्यात आलेल्या संकुलांना येत्या आठवडय़ाभरात दुसरी नोटीस बजावण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने गुरुवारी घेतला. या सोसायटय़ांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार वीज व पाणी जोडणी कापण्याची कारवाई होईलच शिवाय नियमानुसार गांडुळखतासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागेचा अन्य गोष्टींसाठी वापर केलेला आढळल्यास एमआरटीपी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे पालिका अधिकाऱ्यांनी ठरवले आहे. याअंतर्गत संबंधित व्यक्तींना तीन महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच त्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याच्या नियमावर बोट ठेवून महानगरपालिकेने मोठय़ा सोसायटय़ांना त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची नोटीस बजावली होती. मात्र २ ऑक्टोबरची मुदत संपल्यावरही साडेपाच हजारांपैकी केवळ चारशे सोसायटय़ांनीच कचरा व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली. तीन महिन्यांची मुदत मागणाऱ्या सोसायटय़ांना मुदतवाढ देण्याचे पालिकेने ठरवले होते. त्यासाठीही अल्प प्रतिसाद आला. सुरुवातीला याबाबत नरम भूमिका घेणाऱ्या पालिकेने गुरुवारच्या बैठकीत मात्र पवित्रा बदलत कडक कारवाईचे धोरण स्वीकारले आहे. २० हजार चौरस मीटरहून अधिक जागा व्यापलेल्या तसेच २००७ नंतर बांधलेल्या सोसायटय़ांना पालिका अधिकारी प्रत्यक्ष भेट देणार असून कचरा व्यवस्थापन न केलेल्या सोसायटय़ांना तातडीने नोटीस बजावण्यात येईल. याबाबत गुरुवारीच परिपत्रक काढण्याचे ठरले, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waste management mrtp housing societies
First published on: 06-10-2017 at 04:08 IST