लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : हाजी अली येथे दररोज दोन मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प ‘डी’ विभागाने हाती घेतला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास त्यातून वर्षांला एक लाख ८२ हजार युनिटस् वीजनिर्मिती होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली. शहरातील कचरा देवनार आणि कांजूरमार्ग कचराभूमीत टाकला जातो. मात्र, या कचराभूमीची क्षमता संपत आली आहे. याशिवाय संपूर्ण मुंबईतून कचरा गोळा करून तो कांजूरमार्ग आणि देवनार येथे आणण्यात वाहतुकीचा खर्च वाढतो. मुंबईतील विभागांतच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास प्रोत्साहन पालिका देत आहे. यात ओला आणि सुका कचरा वेगळा करून सुका कचऱ्याचा फेरवापर केला जातो. तर ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जाते.

हाजीअली आणि महालक्ष्मी रेसकोर्स याच्याजवळ असलेल्या दीड हजार चौरस फुटाच्या जागेवर हा प्रकल्प उभारण्याची तयारी केली आहे. यात रोज २ मेट्रिक टन ओल्या कचऱ्यापासून दर दिवशी ३०० ते ५०० युनिटस् वीजनिर्मितीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून जैवइंधन तयार केले जाणार आहे. त्याआधारे वीजनिर्मिती केली जाईल, अशी माहिती पालिकेच्या ‘डी’ विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

यासाठी ‘जीपीएस रिन्युएल एनर्जी’ या कंपनीचे तंत्रज्ञान त्यासाठी वापरले जाणार आहे. प्रकल्पाची जागा आणि पाणी याशिवाय अन्य मूलभूत सुविधा पालिका देणार आहे. पूर्णत: यांत्रिकी पद्धतीने चालणाऱ्या या प्रकल्पात फारच कमी मनुष्यबळ लागणार आहे. पहिली दोन वर्षे हा प्रकल्प त्या कंपनीतर्फे चालवला जाणार असून प्रकल्पाची मालकी पालिकेची असणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

एक हजार मेट्रिक टन कचरा वाहून नेण्यासाठी पालिकेला १००० रुपये साधारण खर्च येतो. त्यामुळे दोन हजार मेट्रिक टनकरिता पुढील काही वर्षांचा खर्चही पालिकेचा वाचणार आहे.

येत्या एक-दोन महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होईल. त्यापासून मिळणारी वीज बेस्टला दिली जाणार आहे. जितकी वीज बेस्टला दिली जाईल त्या तुलनेत वीज देयकांत सवलत ‘डी’ विभागाला दिली जाणार आहे.  -प्रशांत गायकवाड, साहाय्यक आयुक्त, डी विभाग