मुंबईतील एका रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली नाचगाणी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २ मार्च रोजी चेंबूरमधील एका महापालिका रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रूग्णालयातील कर्मचारी ‘शांताबाई’ आणि ‘रिक्षावाला’ या गाण्यांच्या तालावर थिरकतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. रूग्णांच्या आरोग्याच्यादृष्टीने रुग्णालयात शांतता पाळणे अपेक्षित असताना थेट ‘ओपीडी’मध्येच अशाप्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यावरून रूग्णालय प्रशासनावर टीका होत आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी २ मार्च रोजी रूग्णालयात आलेल्या रूग्णांची तळमजल्यावरच व्यवस्था करण्यात आली व काहीजणांना दुसऱ्या दिवशी बोलावण्यात आले. त्यामुळे त्या दिवशी फक्त ३७७ रूग्णांचीच तपासणी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी रूग्णालयातील ८० खाटांपैकी निम्मे बेड रिकामे ठेवण्यात आल्याचे तक्रारदारांकडून सांगण्यात आले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार चेंबूरच्या दीवालीबेन मेहता रूग्णालयाच्या ओपीडीमध्ये दोन मार्च रोजी हळदीकुंकू समारंभ झाला. यावेळी स्पीकर्सवर गाणी वाजवण्यात आली. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मुलांनी नृत्याचे कार्यक्रम सादर केले. मुंबई महापालिकेने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. रुग्णालयातील वीस पेक्षा जास्त महिला कर्मचारी, डॉक्टर, परिचारीका आणि चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी चौकशीला सामोरे जात आहेत.