महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा परप्रांतीयांना लक्ष्य केले आहे. ठाण्यातील कोलबाड परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय मासेविक्रेत्यांना बेदम मारहाण करत त्यांना हाकलून लावले. तुम्ही इथे येऊन धंदा केला तर आमचे लोक काय करणार असा सवाल करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मासेविक्रेत्यांना मारहाण केली.

ठाण्यात मच्छीमारीचा व्यवसाय करणारा कोळी समाज विरुद्ध परप्रांतीय मासेविक्रेते असा वाद निर्माण झाला आहे. ठाण्यात ४० ते ५० परप्रांतीय मासेविक्रेते असल्याची तक्रार आली आहे. यामुळे स्थानिक भूमिपूत्र आणि कोळी समाजाचा रोजगार हिरावल्याचा आरोप करत मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी गुरुवारी आंदोलनाचा इशारा दिला. फेरीवालामुक्त ठाणेनंतर आता परप्रांतीयमुक्त मासेविक्री असा निर्धारच त्यांनी केला होता. स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी कोळी समाजाने एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले होते.

अविनाश जाधव यांच्या इशाऱ्यांनतर शुक्रवारी कोलबाड येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय मासेविक्रेत्यांना मारहाण केली. कार्यकर्त्यांनी मासेविक्रेत्यांच्या टोपल्या उचलून फेकल्या आणि त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. परिसरात बसलेल्या सर्व परप्रांतीय मासेविक्रेत्यांना मनसे कार्यकर्त्यांनी हाकलून लावले. या आंदोलनाप्रकरणी ठाणे पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाईला सुरुवात केल्याचे समजते.