घाटकोपरमधील जीवदया मार्गावरील बांधकाम सुरु असलेल्या साईटवर कोसळलेल्या विमानाचा टेक ऑफ करतानाचा व्हिडिओ आता समोर आला आहे.  २२ वर्ष जुने या विमानाच्या दुरुस्तीवर सुमारे आठ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. दुरुस्तीनंतर हे विमान गुरुवारी सकाळी आकाशात झेपावले. विमानाच्या टेक ऑफचा व्हिडिओ आता समोर आला असून टेक ऑफ करताना विमानतळावरील एव्हिएशन कंपनीचे कर्मचारी आणि देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीचे कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून जल्लोष देखील केला. मात्र, हेच विमान पुन्हा कधीच परतणार नाही, असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते.

गुरुवारी दुपारी घाटकोपर पश्चिमेकडील पांजरापोळ मैदानात यू वाय एव्हिएशन या कंपनीचे चार्टर्ड विमान कोसळले. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. हे विमान पूर्वी उत्तर प्रदेश शासनाच्या ताफ्यात होते. यानंतर यू वाय एव्हिएशन या खासगी कंपनीने ते विकत घेतले. २०१५ मध्ये उत्तर प्रदेश सरकारकडून विकत घेतल्यानंतर यू वाय एव्हिएशनने हे विमान दुरुस्तीसाठी इंडामेर कंपनीला दिले. २२ कोटी रुपये खर्च करुन या विमानाची दुरुस्ती करण्यात आली होती.  गुरुवारी सकाळी सव्वा बाराच्या सुमारास जुहू विमानतळावरुन हे विमानात आकाशात झेपावले. चाचणीसाठी विमानाने उड्डाण केले होते. चाचणी पार पडल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून हिरवा कंदील मिळणे अपेक्षित होते. यानंतर हे विमान  यू वाय एव्हिएशन कंपनीच्या ताफ्यात दाखल होणार होते.  गुरुवारी सकाळी विमानाने टेक ऑफ केल्यानंतर विमानतळावरील कंपनीचे कर्मचारी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त करताना दिसतात.

चाचणीसाठी हे विमान दमणपर्यंत गेले होते. जवळपास तासभरानंतर हे विमान पुन्हा जुहू विमानतळावर लँड होणार होते. लँडिंगची तयारी सुरु असतानाच तांत्रिक बिघाड झाला आणि हे विमान भरवस्तीत कोसळले.