News Flash

तू अलिबाग विकत घेतला नाहीस; शेकाप आमदार जयंत पाटील शाहरुखवर भडकले

मी हा मुद्दा अधिवेशनातही मांडणार आहे, असे पाटील यांनी म्हटले आहे.

बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानचा अलिबाग दौरा वादाचा विषय ठरला आहे. शाहरुखच्या बोटीमुळे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांना ताटकळत थांबावे लागले आणि यामुळे जयंत पाटील यांचा पारा चढला. तू अलिबाग विकत घेतला नाहीस, माझ्या परवानगीशिवाय तू अलिबागला येऊ शकत नाही, असे सुनावत त्यांनी राग व्यक्त केला. शाहरुखमुळे जनतेला त्रास झाला असून हा मुद्दा मी अधिवेशनात मांडणार असल्याचे जयंत पाटील यांनी ‘लोकसत्ता ऑनलाईन’ला सांगितले.

शाहरुख खानने ३ नोव्हेंबर रोजी अलिबागमधील फार्म हाऊसवर त्याचा वाढदिवस साजरा केला. शाहरुख बोटीने अलिबागवरुन परतत होता. त्याची बोट गेट वे ऑफ इंडियाजवळील जेट्टीवर पोहोचली. मात्र बराच वेळ शाहरुख बोटीत बसून होता. शाहरुख आल्याचे समजताच जेट्टीजवळ त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. यादरम्यान पोलिसांनी शाहरुखमुळे जेट्टीवर प्रवाशांनाही थांबवले होते. याचा फटका जयंत पाटील यांनाही बसला. जयंत पाटील हेदेखील बोटीने अलिबागला जाण्यासाठी निघाले होते. हा सर्व प्रकार बघून जयंत पाटील संतापले. त्यांनी शाहरुखला गर्दीसमोरच खडे बोल सुनावले. ‘तू अलिबाग विकत घेतला नाही’ असे त्यांनी शाहरुखला सुनावले. गर्दीतील काही तरुणांनी या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

‘लोकसत्ता ऑनलाईन’ने या घटनेबाबत आमदार जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला. पाटील म्हणाले, सुट्टीचे दिवस असल्याने अलिबागला बोटीने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. शाहरुखमुळे जेट्टीवरील वाहतूक थांबवावी लागली. यामुळे असंख्य प्रवाशी खोळंबले होते. शाहरुख बोटीत बसून सिगारेट ओढत होता, चाहत्यांना फ्लाईंग किस देत होता, पण प्रवासी खोळंबले होते. यामुळेच मी त्याला सुनावले, असे पाटील यांनी सांगितले. पोलीस शाहरुखची बाजू घेत होते, हल्ली मंत्र्यांनाही एवढी सुविधा दिली जात नाही, मग शाहरुखसाठी एवढा खटाटोप का ?, मी हा मुद्दा अधिवेशनातही मांडणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, या व्हिडिओत जयंत पाटील संतापल्यावरही शाहरुख शांतपणे बसून होता. जयंत पाटील बोटीने निघून गेल्यावर शाहरुख बाहेर आला आणि चाहत्यांना अभिवादन करुन तो निघून गेला. या घटनेवर शाहरुखकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2017 12:06 pm

Web Title: watch video peasants and workers party leader raigad mla jayant patil heckled shah rukh khan for not coming out of his yacht
टॅग : Jayant Patil,Raigad
Next Stories
1 वीजमाफियांचीही बत्ती गुल!
2 चर्नी रोड पादचारी पूल बंदच!
3 मोबाइलचा गळ आणि माणसाचा मासा!
Just Now!
X