स्थळ – मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस… संध्याकाळी सातच्या सुमारास विदर्भ एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मवरुन सुटली… वृद्ध प्रवासी हातात बॅग घेऊन एक्स्प्रेस पकडण्याचा प्रयत्न करत होते… मात्र एक्स्प्रेस वेगात असल्याने वृद्धाचा तोल गेला आणि ते एक्स्प्रेस आणि प्लॅटफॉर्ममधील पोकळीत अडकले… ते दृश्य बघून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला…. पण आरपीएफमधील कॉन्स्टेबल सचिन साबणे यांनी प्रसंगावधान दाखवत त्या वृद्धाला खेचले आणि त्या वृद्धाची सुखरुप सुटका झाली.

जगन्नाथ विठोबा उन्हाळे (वय ६२) हे रविवारी संध्याकाळी सीएसएमटी स्टेशनवर आले. उन्हाळे यांचे मुंबई- नागपूर दुरांतो एक्स्प्रेसचे आरक्षण होते. मात्र त्यांचा गैरसमज झाला. ते प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वर थांबलेल्या विदर्भ एक्स्प्रेसमध्ये चढायला गेले. ट्रेन वेगात असल्याने त्यांना चढता आले नाही आणि त्यांचा तोल गेला. ते प्लॅटफॉर्म आणि एक्स्प्रेसमधील पोकळीत अडकले. काही अंतरापर्यंत ते फरफटतही गेले. याच दरम्यान रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले सचिन साबणे हे प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वरच होते. सचिन साबणे हे तातडीने उन्हाळे यांच्या मदतीला धावले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत उन्हाळे यांना बाहेर खेचले आणि उन्हाळे यांचे प्राण वाचले.

प्रसंगावधान दाखवणाऱ्या सचिन साबळेंचे सर्वत्र कौतुक होत आहे. सचिन साबळे यांना सन्मानित केले जाईल, अशी माहिती रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.