मुंबई : राज्य सरकारचा कोयना जलविद्युत प्रकल्प आणि टाटा पॉवर कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पांसाठी धरणांतून देण्यात येणारे पाणी वीजनिर्मितीनंतर समुद्रात वाहून जात असल्याने ते पाणी टप्प्याटप्प्याने कमी करून कृष्णा व भीमेच्या तुटीच्या खोऱ्यांमध्ये वळवण्याबाबतचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने जलतज्ज्ञांच्या गटाची नियुक्ती केली असून त्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील लोकप्रतिनिधींचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात कोयना-टाटाच्या जलविद्युत प्रकल्पांच्या पाण्यावर संक्रांत येण्याची शक्यता आहे.

महानिर्मितीद्वारे चालवण्यात येणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी ६७.५ टीएमसी पाणी कोयना धरणातून सोडण्यात येते. वीजनिर्मितीनंतर हे सारे पाणी कोकणात व तेथून समुद्रात वाहून जाते. तर टाटा पॉवर कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पांसाठी स्वातंत्र्यपूर्व काळात लोणावळा, वळवण, शिरवण, सोमवाडी, ठेकरवाडी व मुळशी येथे सहा धरणे बांधण्यात आली होती. या धरणांतील ४२.५ टीएमसी पाणीही जलविद्युत निर्मितीनंतर कोकणात वाहून जाते. अशा रीतीने जवळपास ११० टीएमसी पाणी जलविद्युत निर्मितीनंतर वाहून जात आहे. प्रामुख्याने टाटाच्या जलविद्युत प्रकल्पासाठी भीमा या तुटीच्या खोऱ्यातील असून या खोऱ्यातील बहुतांश भाग हा अवर्षणग्रस्त आहे.

dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
tadoba andhari tiger reserve marathi news, nagzira sanctuary marathi news
Video: ताडोबा व्याघ्रप्रकल्पातील आणखी एक वाघीण नागझिरा अभयारण्यात
water supply from vvmc still not provided global city area of virar
विरारचा ग्लोबल सिटी परिसर अजूनही तहानलेला

अवर्षणग्रस्त भागातील पाणी विपुलतेच्या खोऱ्यात वाहून जात असल्याने या पाण्याच्या वापराबाबत फेरविचार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे हे पाणी टप्प्याटप्प्याने कमी करून ते कृष्णा व भीमा या तुटीच्या खोऱ्यात वळवण्याबाबत जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अ. पां. भावे यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट नियुक्त करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव श्रीकांत हुद्दार, मेरीचे निवृत्त महासंचालक दि. मा. मोरे यांच्यासह जलसंपदा विभागाचे पुणे कार्यालयाचे मुख्य अभियंता, कोकण कार्यालयाचे मुख्य अभियंता, महानिर्मितीचा प्रतिनिधी, टाटा पॉवर कंपनीचा प्रतिनिधी आदी या अभ्यासगटाचे सदस्य असून पाटबंधारे विभागाच्या पुणे कार्यालयाचे अधीक्षक अभियंता हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. अहवाल देण्यासाठी तीन महिन्यांची मुदत या अभ्यासगटाला देण्यात आली आहे.

या अभ्यासगटाच्या अहवालात जनभावनेचे प्रतिनिधित्वही व्हावे यासाठी या पाणीप्रश्नाशी निगडित पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील आमदारांची नियुक्तीही या गटात करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व दौंड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल कुल, मराठवाडय़ाचे प्रतिनिधित्व उस्मानाबादचे असलेले विधान परिषदेतील आमदार सुजितसिंह ठाकूर, तर कोकणाचे प्रतिनिधित्व प्रशांत ठाकूर करतील.

अभ्यासगटाची नियुक्ती

कृष्णा आणि भीमा खोऱ्यांमध्ये म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात शहरीकरण व औद्योगिकीकरण वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर शेतीच्या सिंचनासाठीही पाण्याची मोठी मागणी होत आहे. त्यामुळे टाटा व कोयना जलविद्युत प्रकल्पांसाठी देण्यात येणारे पाणी टप्प्याटप्प्याने कमी करून पाण्याची गरज असलेल्या कृष्णा-भीमा खोऱ्यांमध्ये कशारीतीने वळवता येईल व त्याचे वर्षनिहाय टप्पे ठरवण्याबाबतचा अहवाल या अभ्यासगटाकडून राज्य सरकारने मागितला आहे. या निर्णयामुळे कोकणात पाण्याची किती तूट होईल व ती भरून काढण्यासाठी स्थानिक जलस्रोतांचा विकास कशा रीतीने करता येईल याची उपाययोजना या अभ्यासगटाने सुचवायची आहे. तसेच पारंपरिक जलविद्युत निर्मिती क्षमता कमी होत असल्याने उदंचन जलविद्युतसारखे जलविद्युतचे पर्यायी उपायही या अभ्यासगटाने सुचवावेत, असे जलसंपदा विभागाच्या आदेशात म्हटले आहे.