‘महर्षी दयानंद महाविद्यालया’तील एनएसएस युनिटच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांमध्ये पाण्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी नुकताच लालबाग येथे पथनाटय़ाद्वारे लोकांमध्ये जनजागृतीचा संदेश दिला. मुंबईमध्ये मुबलक पाणी असले तरी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाण्याची टंचाई आहे त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे यासाठी कोरडय़ा रंगांनी धुलीवंदन साजरी करावी, रोजच्या वापरामध्ये पाण्याचा कमीत कमी वापर करावा, स्वयंपाकघरातील वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करावा असे अनेक संदेश पथनाटय़ातून देण्यात आले. त्याबरोबरच झाडे लावा झाडे जगवाच्या संदेशाने नागरिकांना जागृत करण्यात आले. या विद्यार्थ्यांनी परळ आणि लालबाग भागातील वस्तींमध्ये जाऊन लोकांशी संवाद साधला. महाविद्यालया’च्या ‘स्फूर्ती’ या आतंरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये पाणी वाचवा या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम ठेवण्यात आले होते. या महोत्सवात सुमारे ४३ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. स्वीझ पर्यावरण, पाणी आणि झोपडपट्टी विभागाचे मुख्य अ‍ॅलोक्झिया मिशेल या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होत्या.   ‘स्वप्नपूर्ती’ या प्रकल्पातील इयत्या तिसरीतील रिया जाधव हिने शेतकऱ्यांची आत्महत्या या विषयावर भाषण केले.