दहिसर, ओशिवरा, मिठी अशा शेजारच्या नद्यांप्रमाणेच पोयसर नदीचा प्रवासही अस्ताकडे जात होता. मात्र अशातच या नदीच्या आयुष्यात सध्या एक वेगळी घटना होऊ पाहतेय. कालौघात झालेले बदल पुसून नदीचे जुने दिवस परत आणण्यासाठी काही मंडळी गोळा झाली आहेत. एक प्रकारे नदीचे हे पुनरुज्जीवनच.  गेल्या महिन्यात त्यासाठी पहिली बठक झाली.

किशोर कुमार आणि इंदुमती प्रमुख भूमिकेत असलेला ‘शहनाई’ हा चित्रपट १९४७ मध्ये प्रदíशत झाला. त्याकाळी तो सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपकी एक होता. या चित्रपटातील गाणीही तेव्हा लोकप्रिय झाली होती. त्यातलेच एक गाणे म्हणजे ‘छुक छुक छैय्या छैय्या, राजा की तलय्या में है, सोने की मछलिया..’ हे गाणे पाहण्याचा योग आला तो साधारण दहा-बारा वर्षांपूर्वी. कांदिवलीमध्ये. शिक्षण, करिअर सांभाळत परिसरातही काही चांगले काम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या उत्साही तरुणांच्या गटामध्ये हे गाणे दाखवले गेले तेव्हा त्याला चित्रपट रसग्रहणाची पाश्र्वभूमी नव्हती. या गाण्यातील ‘सोने की मछलिया’ असलेला तलय्याचा शोध घ्यायचा होता. ही तलय्या म्हणजे कांदिवलीतील पोयसर नदी. पोयसर नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्यात चित्रित केलेले हे गाणे शोधून ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक अमृत गांगर यांनी त्यावर माहितीपटही तयार केला. यू-टय़ुबवर तो पाहता येईल. आपल्याकडे दस्तावेजीकरणाचा प्रकार फारसा रुजलेला नाही. मात्र मनोरंजनासाठी तयार करण्यात आलेल्या अनेक चित्रपटांनी नकळतपणे हे काम केले, ते याप्रकारे उपयोगी पडले.

या भूतकाळात रमण्याचे कारण म्हणजे नदीचे वर्तमान न सांगितलेलेच बरे. ही नदी कधीही पाहिली नसली तरीही तुम्हाला तिच्या आताच्या अवस्थेची कल्पना सहज करता येईल. मुंबई, ठाणे परिसरातील कोणत्याही नदी, नाला, गटार यांच्याकडे पाहिल्यावर मनात ज्या काही भावना येतात, त्या अगदी तंतोतंत पोयसर नदीला लागू होतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून कांदिवली पूर्वेला मिहद्रा कंपनी, ठाकूर संकुल त्यानंतर पश्चिमेला कांदिवली गाव, डहाणूकर वाडी असा प्रवास करत मालाड पश्चिमेला ती खाडीतून समुद्राला मिळते. साधारण आठ ते दहा किलोमीटरचा प्रवास. मूळ पात्र ३० मीटर रुंदीचे. नदीचा काठ वगरे प्रकार तर आता शिल्लक नाही. दोन्ही बाजूंना बांधलेल्या िभतीतून आणि रोज पात्रात पडणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांच्या गठ्ठय़ांमधून नदीचे पाणी झिरपत झिरपत खाडीपर्यंत पोहोचते. नदीच्या काठावर पूर्वी श्रीमंत वस्ती असे, मात्र आता या ‘नाल्या’च्या वासापासून दूर असलेल्या इमारतींचा भाव वाढला आहे.

दहिसर, ओशिवरा, मिठी अशा शेजारच्या नद्यांप्रमाणेच या नदीचा प्रवासही अस्ताकडे जात होता. मात्र अस्ताला जाण्याचा प्रवास करणाऱ्या या नदीच्या आयुष्यात सध्या एक वेगळी घटना होऊ पाहतेय. कालौघात झालेले बदल पुसून नदीचे जुने दिवस परत आणण्यासाठी काही मंडळी गोळा झाली आहेत. एक प्रकारे नदीचे हे पुनरुज्जीवनच. दहिसर नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमधून प्रेरणा घेत पोयसरलाही आपले म्हणण्यासाठी हा प्रयत्न आहे. गेल्या महिन्यात त्यासाठी पहिली बठक झाली. शहरात रिव्हर मार्च घेऊन काम करणाऱ्या मंडळींच्या सल्ल्याने या नदीसाठी नेमके काय करता येईल याची चर्चा झाली. दहिसर नदीप्रमाणेच या नदीवरही रिव्हर मार्च घेण्याचे ठरले. रिव्हर मार्च म्हणजे नदीच्या काठाने केलेला प्रवास. गटार झालेल्या नदीमध्ये काय असेल पाहण्यासारखे? पण वास्तवाशी ओळख झाल्याशिवाय ते बदलता येत नाही. नदीची नेमकी दुखणी समजली की उपायही सुचतात. गेले चार रविवार नदीकाठाने प्रवास सुरू राहिला. खाडीपासून नदीच्या उगमापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न होता. या शनिवारी प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह हेदेखील पोयसर नदीची भेट घेण्यासाठी आले. नदीला तिचे जुने रूपडे देण्यासाठी नेमके काय करता येईल, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. राजस्थानच्या वाळवंटात पाण्याचा दुष्काळ मिटवणाऱ्या राजेंद्र सिंह यांचा अनुभव आणि त्यांचे शब्द यामुळे नदीचे पुनर्वसन करू पाहणाऱ्यांचा उत्साह दुणावला आहे.

केंद्र सरकारने नवामी गंगेसारख्या हाती घेतलेल्या प्रकल्पाला फारसे यश न येण्याचे कारण म्हणजे त्यात स्थानिकांचा नसलेला सहभाग. पोयसर, दहिसर नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी त्यामुळेच स्थानिकांच्या मदतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. महानगरपालिकेने दहिसर नदीचे सौंदर्यीकरण हाती घेतले आहे. पोयसर नदीबाबतही पालिकेकडून पावले उचलली जात आहेत. मात्र प्रशासनाकडून होणारे बांधकाम आणि नदीचे पुनरुज्जीवीकरण हे दोन वेगळे मुद्दे आहेत. प्रशासन नदीचा काठ सुधारणार आहे, नदीवरून पादचारी पूल बांधणार आहे, नदीपात्रात घरे केलेल्यांसाठी दुसरीकडे जागा दिली जाणार आहे. हे प्रयत्न आवश्यक आहेतच. पण स्थानिकांच्या मदतीशिवाय नदीचे पाणी स्वच्छ होणे शक्य नाही. भारतीय नदीला पवित्र मानतात. नदीच्या पाण्यात स्नान केल्याने पाप धुतले जाते, ही संकल्पनाही भारतीय परंपरेत आहे. यातील श्रद्धा-अंधश्रद्धेचा भाग वगळला तरी नदीला उच्चस्थानी मानणारेच या नदीत कचरा करतात. तेव्हा ही नदी आहे, नाला नाही हे समजल्याशिवाय या नदीला जुने दिवस दिसणार नाहीत.

रिव्हर मार्चमध्ये सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांनी ँ३३स्र्://६६६.१्र५ी१ें१ूँ.१ॠ/ या संकेतस्थळामार्फत संबंधित कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचता येईल. अर्थात रिव्हर मार्चमध्ये केवळ नदीचे पुनरुज्जीवन अपेक्षित नाही तर एकूणच पाण्याकडे आणि पाण्याच्या वापराकडे पाहण्याच्या दृष्टीत संवेदनशीलता येणे गरजेचे आहे. कोणतेही पाणी वाया जाणार नाही किंवा दूषित होणार नाही, अशी काळजी घेतली की मग गटार, नाले किंवा नदी असे सर्वच जलस्रोत शुद्ध करण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी करावी लागणार नाही.

prajakta.kasale@expressindia.com