सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात नैसर्गिक साधनसंपत्तीचा विवेकशील वापर करून पर्यावरणस्नेही जीवन जगण्याचे मार्ग अनुसरणाऱ्या भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानने नाबार्ड आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सहकार्याने गेल्या आठवडय़ात परिसरातील ४० गवंडय़ांची प्रशिक्षण कार्यशाळा कुडाळ तालुक्यातील झाराप येथे आयोजित केली होती. मुंबईतील जलवर्धिनी प्रतिष्ठानच्या उल्हास परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित गवंडय़ांनी तीन प्रकारच्या पाणी साठवण टाक्या बांधून तळकोकणात जलसंवर्धनाची पायाभरणीच केली.
पाऊस बेभरवशाचा असला तरी पाणी साठविण्याच्या साध्या आणि सोप्या पद्धतींचा अवलंब करून परिणामकारकपणे जल व्यवस्थापन करता येते, हे उल्हास परांजपे यांनी १४ प्रकारच्या साठवण टाक्यांद्वारे दाखवून दिले आहे.
फेरोसिमेंट, नारळाच्या काथ्या तसेच उपलब्ध स्थानिक साधनांचा वापर करून सोप्या तंत्रज्ञानाने एक हजार ते २० हजार लिटर्स क्षमतेच्या साठवण टाक्या उभारता येतात. झाराप येथे कार्यरत भगीरथ ग्रामविकास संस्थेने परिसरात बायो गॅस तयार करण्याचा उपक्रम राबविला आहे. या बायोगॅस सयंत्रासाठी फेरोसिमेंटचे डोम स्थानिक गवंडी तयार करतात. याच गवडय़ांना फेरोसीमेंटचा वापर करून पाणी साठवण टाक्या बांधण्याचे प्रशिक्षण परांजपे यांनी तीन दिवसांच्या कार्यशाळेत दिले.
कार्यशाळेत गवंडय़ांनी जमिनीखालील १८ हजार, तर जमिनीवरील दहा हजार लिटर साठवण क्षमता असणाऱ्या दोन मोठय़ा टाक्या तसेच दीड हजार लिटर क्षमतेची छोटी टाकी बांधली.
विशेष म्हणजे या टाक्या बांधण्यासाठी परिसरात मुबलक उपलब्ध असणारे नारळाचा काथ्या, किवन तसेच कुंबियाचे धागे वापरण्यात आले. दिवसभर टाक्या उभारणी आणि संध्याकाळी प्रशिक्षण वर्गात शंका निरसन असे या कार्यशाळेचे स्वरूप होते.
भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने कुडाळ परिसरात हा उपक्रम राबविला जातो. प्रशिक्षणात सहभागी सर्व गवंडय़ांनी आपापल्या घराच्या आवारात साठवण टाकी बांधण्याचे मान्य केले असून, त्यासाठी भगीरथ प्रतिष्ठान त्यांना काही प्रमाणात अनुदान देणार असल्याची माहिती डॉ. प्रसाद देवधर यांनी दिली.